मुंबई : भिवंडीतील ग्लॅक्सो स्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्सकडे अंधेरीतील नॉर्थ वेस्ट फार्मा हबने ‘रॅबीपूर’ इंजेक्शन या औषधांची मागणी केली होती. मात्र ‘ग्लॅक्सो’ने योग्य कारण न देता इंजेक्शनचा पुरवठा केला नाही. त्यामुळे नॉर्थ वेस्ट फार्मा हबने अन्न व औषध प्रशासनाकडे दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ‘ग्लॅक्सो’विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नॉर्थ वेस्ट फार्मा हबने १६ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर २०१६ या काळात तब्बल सहा वेळा ‘रॅबीपूर’ या इंजेक्शनची मागणी केली होती. भिवंडीतील संस्थेने ‘रॅबीपूर’च्या १ लाख २८ हजार ४१० वायल्सची खरेदी करून त्याची विक्री मुंबईसह राज्यभरात केली. मात्र, ‘नॉर्थ वेस्ट फार्मा’ला या औषधाची विक्री केली नाही आणि विक्री का केली नाही, याचे योग्य कारणही कळविले नाही. त्यामुळे नॉर्थ वेस्ट फार्मा हबने एफडीएकडे दाद मागितली. या तक्रारीची दखल घेऊन ‘ग्लॅक्सो’च्या गोदामाची झडती घेतल्यानंतर त्यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५मधील कलम ३चे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी, ‘ग्लॅक्सो’वर गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
ग्लॅक्सो स्मिथक्लाइनला एफडीएचा दणका
By admin | Published: December 24, 2016 3:34 AM