नववर्षाच्या पार्ट्यांवर एफडीएची करडी नजर, उद्यापासून विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 05:38 AM2017-12-14T05:38:06+5:302017-12-14T05:38:30+5:30
सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. या वेळी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये होणारी गर्दी पाहता, पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी आणि मुंबईकरांच्या पार्टीचा बेरंग होऊ नये, यासाठी १५ डिसेंबरपासून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विशेष मोहीम सुरू करणार आहे.
मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देत, नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. या वेळी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये होणारी गर्दी पाहता, पदार्थामधील भेसळ रोखण्यासाठी आणि मुंबईकरांच्या पार्टीचा बेरंग होऊ नये, यासाठी १५ डिसेंबरपासून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विशेष मोहीम सुरू करणार आहे.
एफडीएच्या या विशेष मोहिमेंतर्गत १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हॉटेल व रेस्टॉरंट, वाइन शॉप्स, बेकरी आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी करण्यात येणार आहे. काही संशयास्पद आढळल्यास तेथील नमुने घेऊन त्यानुसार दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. याचा अहवाल नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्यात येईल. या नमुन्यात दोष आढळल्यास संबंधित हॉटेल मालकावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती ‘एफडीए’च्या अधिका-याने दिली.
थर्टीफर्स्टच्या पार्टीची तयारी मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. या वेळी हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आदी ठिकाणी होणारी गर्दी पाहता, येथील खाद्यपदार्थांचा दर्जा राखण्यास अनेकदा सर्रास दुर्लक्ष केले जाते. शिवाय खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. त्यामुळेच नववर्षाच्या अशा पार्ट्यांवर एफडीए करडी नजर ठेवणार आहे.
नववर्षानिमित्त हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये बरीच गर्दी असते. मोठ्या प्रमाणात दारू रिचवली जाते. त्यामुळेच भेसळयुक्त पदार्थ, दारू यामुळे विषबाधा होऊ नये, यासाठी शहर-उपनगरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, दुकाने, मद्यविक्रेते यांचे परवाने आणि नोंदणीही तपासली जाणार आहे. शुक्रवारपासून सुरू होणाºया या मोहिमेत अन्न व दारूचे नमुने गोळा करण्यात येतील. त्याची तपासणी करून, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
- चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त (अन्न विभाग)