रेस्टॉरंट्सवर एफडीएची नजर
By admin | Published: December 31, 2015 03:57 AM2015-12-31T03:57:54+5:302015-12-31T03:57:54+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून सेलीब्रेशनसाठी खास मेन्यूची निवड झाली आहे. पण, मागणी वाढल्याने अन्नात भेसळ होण्याचा धोका लक्षात घेऊन अन्न व औषध
मुंबई : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबापुरी सज्ज झाली असून सेलीब्रेशनसाठी खास मेन्यूची निवड झाली आहे. पण, मागणी वाढल्याने अन्नात भेसळ होण्याचा धोका लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कंबर कसली आहे. ३० आणि ३१ डिसेंबरला हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबची तपासणी करण्यात येणार असून १ जानेवारीला सर्व अहवाल सादर केले जाणार आहेत. त्याचप्रमाणे सात दिवसांत कारवाई करणार असल्याची माहिती एफडीए आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिली.
डिसेंबरची सुरुवात झाली की, वेध लागतात, ख्रिसमस आणि थर्टीफर्स्टच्या पार्टीचे. ख्रिसमस मुंबईत उत्साहात साजरा झाल्यावर थर्टीफर्स्टचे प्लॅनिंग जोरदार सुरू झाले. हॉटेल्स, क्लब, रेस्टॉरंट, धाबे अशी सर्व ठिकाणे हाऊसफुल्ल होणार आहेत. सोसायट्यांतही पार्ट्यांचे आयोजन झाले आहे. पार्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचे असते ते अन्न. ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी अन्नाची मागणी वाढते. त्यात भेसळ झाल्यास किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न वापरल्यास नवीन वर्षाच्या पार्टीचा बेरंग होऊ शकतो. हे टाळण्यासाठी एफडीए सज्ज झाली आहे. ३० डिसेंबरपासूनच अन्नपदार्थांची तपासणी सुरू झाली आहे. ३१ डिसेंबरलाही ही तपासणी करण्यात येणार आहे. काही ठिकाणी भेसळ झाल्याचे किंवा अस्वच्छ ठिकाणी अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे निदर्शनास आल्यास नमुने ताब्यात घेतले जाणार आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताब्यात घेण्यात आलेले नमुन्यांची तत्काळ तपासणी करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल १ जानेवारीला सादर केला जाणार आहे. तर संबंधित आस्थापनांवर सात दिवसांच्या आत कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई अहवालही सात दिवसांनी प्रशासनासमोर सादर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)