मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यार्थी वसतीगृहातील कॅण्टीनमधील अन्नाचे नमुने अन्न व औषधे प्रशासन विभागाने (एफडीए) तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. दोन दिवसांपूर्वी इथल्या कॅण्टीनमधील चिकन फ्राईड राईसमध्ये झुरळ सापडल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. या आधीही या हॉस्टेलमधील अन्नाच्या दर्जाबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली आहे. एकदा डास तर एकदा रबरबॅण्ड आढळून आल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाकडे नोंदवण्यात आली होती. मात्र तरिही कॅण्टीनचा चालक बदलण्यात आलेला नाही. आता विद्यार्थ्यांनी एफडीएकडे तक्रार नोंदवून अन्नाची तपासणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी एफडीएच्या टीमने येथील कॅण्टीनला भेट देत अन्नाचे नमुने ताब्यात घेतले.
तयार भाज्या, डाळ, अंडा बिर्याणीचे नमुने एफडीएने ताब्यात घेतले आहेत. या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाईल. ते फूड सेफ्टी अण्ड स्टॅण्डर्ड्स अक्ट, २००६ नुसार आहेत, हे तपासले जाणार आहे.