झोमॅटो, स्विगी, फूडपांडाला एफडीआयची नोटीस; अस्वच्छ ठिकाणांहून अन्न पुरवत असल्याचं उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 08:39 PM2018-10-10T20:39:54+5:302018-10-10T20:41:42+5:30
कंपन्यांना खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या 113 आस्थापनांदेखील नोटीस
नवी दिल्ली: ऑनलाईन खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्यांना एफडीआयनं नोटीस पाठवली आहे. यामध्ये स्विगी, फूडपांडा, झोमॅटो, उबर ईट्स यांचा समावेश आहे. या कंपन्या अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ ग्राहकांना पुरवत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या कंपन्यांना एफडीआयनं नोटीस बजावली आहे.
खाद्यपदार्थांच्या ऑनलाईन ऑर्डर स्वीकारणाऱ्या कंपन्यांकडून कोणत्या वातावरणात अन्नपदार्थ तयार केले जातात, याची तपासणी एफडीआयकडून करण्यात आली. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. अतिशय खराब वातावरणात तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ या कंपन्यांकडून ग्राहकांना पुरवले जात असल्याचं यातून दिसून आलं. यामध्ये स्विगी, फूडपांडा, झोमॅटो, उबर ईट्स या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कंपन्या ज्या हॉटेल्समधून अन्नपदार्थ घेतात, त्यातील 113 आस्थापनं विनापरवाना सुरू असल्याची माहितीदेखील एफडीआयच्या तपासणीत समोर आली आहे.
एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी 21 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 347 आस्थापनांना भेटी दिल्या. यातील 113 आस्थापनांची नोंद अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेली नाही. यातील 85 आस्थापनं स्विगी, 50 आस्थापनं झोमॅटो, 3 आस्थापनं फूडपांडा आणि 2 आस्थापनं उबरईट्सशी संलग्न आहेत. या सर्व आस्थापनांना नोटीस पाठवण्यात आल्या असून त्यांच्या उत्तरानंतर कारवाई केली जाईल, अशी माहिती एफडीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली.