एफडीएची मासे विक्रेत्यांवर नजर, ‘फॉर्मलीन’चे प्रमाण केले निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 04:48 AM2019-06-16T04:48:33+5:302019-06-16T04:48:51+5:30
गोड्या पाण्यातील मासे आणि खाऱ्या पाण्यातील मासे जास्त कालावधीपर्यंत टिकून राहावेत, म्हणून व्यापाऱ्यांकडून ‘फॉर्मलीन’ रसायनाचा वापर होतो.
- सागर नेवरेकर
मुंबई : गोड्या पाण्यातील मासे आणि खाऱ्या पाण्यातील मासे जास्त कालावधीपर्यंत टिकून राहावेत, म्हणून व्यापाऱ्यांकडून ‘फॉर्मलीन’ रसायनाचा वापर होतो. हे रसायन मानवी शरीराला घातक असते. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण, नवी दिल्ली (एफएसएसएआय)ने आता फॉर्मलीन रसायनाचे प्रमाण निश्चित केले आहे. रसायन प्रमाणाच्या बाहेर माशांमध्ये आढळून आल्यास त्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई केली जाणार आहे.
इतर राज्यातून किंवा देशातून आयात होणाºया माशांवर मोठ्या प्रमाणात फॉर्मलीनचा वापर केला जातो. फॉर्मलीन रसायन मानवी शरीरात जास्त प्रमाणात गेल्यावर पोटदुखी, अतिसार आणि मुत्रपिंडा संबंधित आजार उद्भवतात. त्यामुळे गोड्या पाण्यातील माशांमध्ये प्रति किलोमागे ४.० मिलीग्रॅम फॉर्मलिन आणि खाºया पाण्यातील माशांमध्ये प्रति किलोमागे १०० मिलीग्रॅम फॉर्मलीनचे असे एफएसएसएआयने निश्चित केले. गेल्यावर्षी गोव्यामध्ये फॉर्मलीन रसायनाचा अतिवापर केलेले मासे आढळून आले होते.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी सांगितले की, एफएसएसआयने आता माशांमध्ये फॉर्मलीन किती असावेत याचे निकष दिले आहेत. आता मासे विक्रेते या प्रमाणाचे पालन करून ग्राहकांना रसायन नसलेले मासे विकत आहेत का? यावर एफडीए लक्ष ठेवेल. तसेच फॉर्मलीन रसायनाच्या प्रमाणाचा वैज्ञानिक अभ्यास करत आहेत.
पाण्यातून मासे काढल्यावर ते लगेच खराब होतात. त्यामुळे या माशांचे ताजेपण कायम राहावे यासाठी फॉर्मलीन रसायन वापरल्याने मासे ताजे राहतात. माशांमध्ये नैसर्गिकरीत्या फॉर्मलीनचे प्रमाण असते, परंतु फॉर्मलीनचा जास्त वापर गोड्या पाण्यातील माशांमध्ये केला जातो. महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात मासेमारी बंद असते. त्यामुळे इतर राज्यांतून आणि देशांतून येणाºया माशांवर फॉर्मलीन रसायनाचा वापर केला जातो.
- स्वप्निल तांडेल, समुद्री जीव अभ्यासक व संशोधक