मुंबई : गणेशोत्सव भक्तीचा आणि उत्सहाचा उत्सव असला, तरी आता रस्त्यांवर मंडप उभारणे, डीजे वाजविणे, जलप्रदूषण टाळण्यासाठी जलाशयांमध्ये विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. त्यात आता महाप्रसादाची भर पडली आहे. प्रसादातून विषबाधा, भेसळ अशा घटना टाळण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत राज्याच्या कानाकोपऱ्यात विशेष अन्नसुरक्षा अधिकाºयांचे पथक सार्वजनिक उत्सवातील महाप्रसादावर लक्ष ठेवणार आहे.अन्नसुरक्षा मानके कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजविणे, अन्नाचे वाटप करणे अथवा अन्नाची विक्री करणे, यासाठी एफडीएची नोंदणी आणि परवाना बंधनकारक आहे. अगदी धार्मिक कार्यासाठी अन्न शिजविण्याकरिता किंवा कुठल्याही धार्मिक सणाच्या वेळेस महाप्रसाद तयार करण्यासाठी वा त्याचे वाटप करण्यासाठीदेखील ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक आहे, अशी नोंदणी नसेल, तर ‘एफडीए’ला कारवाई करण्याचा अधिकार आहे. विषबाधा होऊ नये आणि स्वच्छ सुरक्षित अन्नप्रसाद-महाप्रसाद म्हणून भक्तांना दिला जावा, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे दरवर्षी ‘एफडीए’कडून गणेशोत्सव मंडळांना नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे.या काळात राज्यभरात २२२ अधिकारी मंडळामध्ये ठेवण्यात येणारा प्रसाद, तसेच दुकानातील खवा यांच्यावर लक्ष ठेवणार असणार आहेत. विशेष म्हणजे, मुंबईमध्ये २२ अन्नसुरक्षा अधिकारी आणि १२ सहायक आयुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेश मंडळांसह मिठाई विक्रेत्यांच्या दुकानांचीही तपासणी केली जाणार आहे.तयार प्रसाद थंड आणि स्वच्छ जागेत ठेवण्याच्या सूचना मंडळांना केल्या जाणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन (अन्न) विभागाचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी दिली आहे.>‘मंडळांना माहिती देणार’गणपती मंडळांनी शक्यतो स्वत: तयार केलेल्या प्रसादाचे वाटप करावे, प्रसादासाठी वापरण्यात येणाºया पदार्थांची गुणवत्ता तपासावी. याबाबत गणेश मंडळांच्या पदाधिकाºयांना माहिती दिली जाणार आहे.
गणेशोत्सवातील प्रसादावर एफडीएची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 5:00 AM