राज्यात सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी एफडीआय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 06:19 IST2025-01-04T06:18:25+5:302025-01-04T06:19:19+5:30
केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात सहा महिन्यांत १.१३ लाख कोटी एफडीआय, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आकडेवारी
मुंबई : राज्यात अवघ्या सहा महिन्यांत १ लाख १३ हजार २३६ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक (एफडीआय) आली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. वार्षिक सरासरीच्या ९५ टक्के एफडीआय अवघ्या ६ महिन्यांत आल्याचे त्यांनी ‘एक्स’वर जाहीर केले.
केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने दिलेल्या आकडेवारीच्या आधारे फडणवीस यांनी ही माहिती दिली आहे.
गेल्या ४ वर्षांतील सरासरी पाहिली तर १ लाख १९ हजार ५६६ कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या ९४.७१ टक्के गुंतवणूक ही फक्त सहा महिन्यात आली आहे. आपले सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देत ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेत.
राज्यातील परकीय गुंतवणुकीची आकडेवारी (आकडे कोटी रुपयांमध्ये) -
वर्ष किती परकीय गुंतवणूक
२०२०-२०२१ १,१९७३४
२०२१-२०२२ ११४९६४
२०२२-२०२३ ११८४२२
२०२३-२०२४ १२५१०१
२०२४-२०२५ (एप्रिल ते सप्टेंबर) ११३२३६
विविध राज्यांमधील परकीय गुंतवणूक
राज्य २०२२-२०२३ २०२३-२०२४ २०२४-२०५
(एप्रिल ते मार्च) (एप्रिल ते मार्च) (एप्रिल ते सप्टेंबर)
कर्नाटक ८३६२८ ५४४२७ २९५९७
गुजरात ३७०५९ ६०६०० ३३०६०
दिल्ली ६०११९ ५३९८० २६८०७