इंधन दरवाढीमुळे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती - बाल मलकित सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 03:00 AM2018-09-05T03:00:09+5:302018-09-05T03:00:24+5:30
पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूकदार नाराज आहेत. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूकदारांचा खर्च वाढणार असल्याने सुमारे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर समितीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी वर्तवली आहे.
मुंबई : पेट्रोल व डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतूकदार नाराज आहेत. डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूकदारांचा
खर्च वाढणार असल्याने सुमारे १५ टक्के दरवाढ होण्याची भीती आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर समितीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग यांनी वर्तवली आहे. या दरवाढीमुळे वाहतूकदारांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही नाराजीचा सूर आहे.
मालवाहतूकदारांच्या एकूण खर्चापैकी तब्बल ६५ टक्के खर्च डिझेलवर होतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या दरवाढीचा फटका मालवाहतूकदारांना व पर्यायाने सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. याबाबत आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या कोअर समितीचे अध्यक्ष बाल मलकित सिंग म्हणाले की, एका निश्चित क्षमतेपर्यंत इंधन दरवाढ सहन करण्याची आमची क्षमता आहे. मात्र, त्यानंतर वाहतुकीचे दर वाढविण्याशिवाय आमच्याकडे कोणताही पर्याय राहणार नाही.
राज्याने इंधनावर लावलेल्या विविध करांचे प्रमाण कमी करण्याची तीव्र आवश्यकता आहे, मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. २१ सप्टेंबरला संघटनेच्या व्यवस्थापन समितीची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. त्यामध्ये चर्चा करून इंधन दरवाढीचा फटका सहन करण्यासाठी मालवाहतूक दरामध्ये सुमारे १५ टक्के वाढ होण्याची शक्यताही बाल मलकित सिंग यांनी वर्तविली.
देशाच्या इतिहासात इंधन दरवाढीने उच्चांक गाठला असून दर कमी होण्याऐवजी या दरात सातत्याने वाढ होत असल्याने आमच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिल्याची नाराजी गृहिणी भावना सिंग यांनी व्यक्त केली.
दरवाढीमुळे गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. मोठ्या प्रमाणात राज्यांचा कर लागू करण्यात आल्याने दरवाढ झाली असून करांचे प्रमाण तत्काळ कमी करण्याची गरज आहे. इंधन दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. महागाईमध्ये निश्चितपणे वाढ होईल. सरकारने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत उपाययोजना आखण्याची गरज आहे. व्हॅटचे प्रमाण कमी केल्याशिवाय दर कमी होणार नसल्याने सरकारने याचा निर्णय घ्यावा.
- अनिल विजन, सरचिटणीस, बॉम्बे गुडस ट्रान्सपोर्ट असोसिएशन
सरकारने एकदाच निर्णय घेऊन पेट्रोलचे दर १०० रुपये प्रति लीटर करावे मात्र त्यानंतर किमान दोन वर्षे तरी दरवाढ करू नये.
मुंबईतील वाहतूककोंडीमुळे वेग मंदावलेला असल्याने मायलेजदेखील कमी मिळत असल्याने दुचाकी चालवणे कष्टप्रद होत चालले आहे. त्यामुळे सीएनजीवर चालणाऱ्या दुचाकी बाजारात आणण्याची गरज आहे.
- सुबोध मोरे, दुचाकीस्वार
सरकारने सर्वसामान्य नागरिकांना छळण्याचा हा मार्ग त्वरित बंद करून त्यांना वाढत्या महागाईतनू दिलासा द्यावा. ज्या प्रमाणात दरवाढ होत आहे त्या प्रमाणात वेतन वाढत नसल्याने कुटुंबाचे मासिक बजेट कोलमडत आहे.
- प्रज्ञा तेरवणकर, महाविद्यालयीन तरुणी