Join us

पदपथ अडवल्याने अपघाताची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2015 1:46 AM

मॅफ्को मार्केटसमोर हावरे इंजिनीअर्स अँड बिल्डर्सच्या वतीने टॉवरचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विकासकाने पदपथावर पत्रे ठोकल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

नवी मुंबई : मॅफ्को मार्केटसमोर हावरे इंजिनीअर्स अँड बिल्डर्सच्या वतीने टॉवरचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. विकासकाने पदपथावर पत्रे ठोकल्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. बांधकाम करताना आधीच संरक्षक भिंत न बांधल्यामुळे एमटीएनएलच्या बाजूला जमीन खचू लागली आहे. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तुर्भे गावाला लागून मॅफ्को मार्केटसमोर सिडकोने मिनी जनता मार्केट तयार केले होते. या मार्केटच्या पुनर्विकासाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. या ठिकाणी काही महिन्यांपासून हावरे इंजिनीअर्स अँड बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने रेनबो बिझनेस पार्क बांधण्यात येत आहे. बांधकाम करताना भूखंडाला पत्र्याचे कुंपण घालणे आवश्यक असते. या व्यावसायिकानेही कुंपण घातले आहे. काही ठिकाणी अर्धा पदपथ अडविला आहे. एपीएमसी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ हा भूखंड आहे. येथून दररोज हजारो नागरिक मार्केटकडून रेल्वे स्टेशनकडे जातात. पदपथ अरुंद झाल्यामुळे त्यांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. सकाळी ५० ते ६० किलो वजनाच्या फळांच्या पाट्या नेल्या जातात. अपघाताची शक्यता निर्माण होऊनही महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विकासकाच्या वतीने प्लिंथचे काम सुरू आहे. यासाठी भूखंडामध्ये खोदकाम करण्यात आले आहे. भूखंडाच्या समोरील बाजूला निवासी इमारती आहेत. डाव्या बाजूला एमटीएनएलची छोटी इमारत आहे. रस्त्याच्या बाजूला दुकाने आहेत. संरक्षक भिंत बांधली नसल्यामुळे पावसाळ््यात जमीन खचू लागली आहे. एमटीएनएलची आग विझविण्यासाठी पाणी वाहून नेणाऱ्या पाइपजवळील बाजू घसरली आहे. त्या जागेचा वापर करता येणार नाही. वर्दळीच्या ठिकाणी बांधकाम करताना ठेकेदारांकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आलेली नाही. अशीच स्थिती राहिली तर मुसळधार पावसामध्ये रस्त्यालगतची दुकाने, एमटीएनएल किंवा समोरील निवासी इमारतींच्या बाजूचा भाग कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कोपरखैरणेमध्ये मल्लूम मॉलचे बांधकाम करताना काही वर्षांपूर्वी अपघात झाला होता. या ठिकाणी योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्याचप्रकारची दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकाराकडे महापालिकेनेही पूर्णपणे डोळेझाक केली आहे.पत्रे हटवून संरक्षक भिंतही बांधणार बांधकाम व्यवसायिक सुरेश हावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, भूखंडाच्या सीमेवर पत्रे लावण्यात आले आहेत. जर काही ठिकाणी पत्रे पदपथावर आले असतील तर ते तत्काळ हटविण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. एमटीएनएल बाजूची भिंतही बांधून देण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या असून सुरक्षेसाठी पुरेशी काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारवाईकडे दुर्लक्ष बांधकाम करताना बांधकाम व्यावसायिकाने पदपथावरील अतिक्रमण तत्काळ हटवणे आवश्यक आहे.महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कारवाई करून पदपथ मोकळा करणे आवश्यक असताना अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नसल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या ठिकाणी सर्वेक्षण करून जर नियमांचे उल्लंघन करण्यात आले असेल तर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. बांधकामाच्या ठिकाणी नियमाप्रमाणे काम सुरू आहे का हे आमच्या विभागाकडून पाहिले जाईल. जर नियमांचे उल्लंघन केले असेल तर उचित कार्यवाही केली जाईल. - सुनील हजारे,सहायक संचालक नगररचना