गर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती : पाय-यांवर लाद्या नाहीत, मरिन लाइन्सचा प्रवास गंजलेल्या पुलावरून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 05:12 AM2017-10-17T05:12:31+5:302017-10-17T11:35:16+5:30
मरिन लाइन्स स्थानकाच्या फलाट क्रमांक ४वरून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेर पडत असत. तिथून बाहेर पडल्यावर सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला जाता यायचे, पण आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून
- पूजा दामले
मुंबई : मरिन लाइन्स स्थानकाच्या फलाट क्रमांक ४वरून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेर पडत असत. तिथून बाहेर पडल्यावर सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला जाता यायचे, पण आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून बसविलेल्या रेलिंगमुळे प्रवाशांचा त्रास वाढला आहे. त्यातच पूल गंजलेला आहे. जास्त प्रवासी या पुलावरून ये-जा करताना हा पूल हलतो. गर्दीच्या वेळी दुर्घटनेची भीती नाकारता येत नाही. बाहेरील तीन पुलांपैकी दोन पुलांवरून बाहेर पडताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.
मरिन लाइन्स स्थानकावरून प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी एकूण तीन पूल आहेत. त्यापैकी चर्नी रोड स्थानकाच्या बाजूला असलेल्या पुलाची दुरवस्था झाली आहे. रेलिंग लावल्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात या पुलावरून बाहेर पडतात. रस्त्यावर रेलिंग बसवल्यामुळे बस थांब्यावर जाण्यासाठीही प्रवाशांना पुलाचा वापर करावा लागतो. त्यामुळे गर्दीत वाढ होत असल्याने दुर्घटना घडण्याची भीती आहे.
धोक्याचा प्रवास : तीन पुलांपैकी चर्नी रोड स्थानकाच्या बाजूला असणाºया पुलाच्या लाद्या तुटलेल्या होत्या. त्या संदर्भात मी पत्र लिहिले होते, पण हा पूल उपप्रमुख अभियंता (पूल) या कार्यालयाशी संबंधित असल्याचे कळविण्यात आले. तिथेही मी पाठपुरावा करत आहे. या पुलावरून पलीकडे जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. तरीही पर्याय नसल्याने प्रवासी तिथूनच प्रवास करतात. - अमित भाद्रिचा, प्रवासी
रुंदीकरण गरजेचे : मरिन लाइन्स स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. चंदनवाडी येथून स्थानकावर जाणाºया पुलाची रुंदी प्रवाशांच्या मानाने कमी आहे. प्रवासी संख्या अधिक असते. अशा वेळी एखाद्या व्यक्तीचा तोल गेला, अथवा काही अपघात झाल्यास मोठी दुर्घटना होण्याचा धोका आहे. पुलाचे रुंदीकरण आवश्यक आहे. - राज पुरोहित, स्थानिक आमदार
काम करून घेणारच : मरिन लाइन्स स्थानकाच्या बाहेरील तिन्ही पुलांची दुरवस्था झाली आहे. या प्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून पाठपुरावा करीत आहे. या प्रकरणी मी सी वॉर्ड कार्यालयाशी संपर्क साधला आहे. त्यांनी ‘पॅच वर्क’ केल्याचे सांगितले आहे. सातत्याने पाठपुरावा करून या तिन्ही पुलांचे काम करून घेणार आहे.
- रिटा मकवाना, स्थानिक नगरसेवक
ज्येष्ठ नागरिकांना त्रास : मरिन लाइन स्थानकावरील चर्नी रोड स्थानकाच्या बाजूच्या पुलाचा अधिक प्रवासी करतात. या पुलावरील तुटलेल्या लाद्या काढून तिथे सिमेंटचा कोबा घातला आहे. पायºयावरही हीच परिस्थिती आहे. अशा अवस्थेतील पायºयांमुळे याचा ज्येष्ठ नागरिकांना अधिक त्रास होतो. पावसात सिमेंटचा रस्ता निसरडा होतो.
- निकिता गवळी, प्रवासी
तक्रारींकडे दुर्लक्ष : दरवर्षी या ठिकाणच्या पुलाच्या लाद्या निखळतात. पावसाळ््याआधी या पुलाचे काम केले, तरी हे काम कच्चेच असते. त्यामुळे पुढच्या दोन महिन्यांत लाद्या निखळतात अथवा तुटतात. प्रवासी अनेकदा तक्रारी करतात, पण या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते.
- सन्मान पिंगळे, प्रवासी
सूचना, तक्रारी, व्हिडीओ : ‘लोकमत’च्या वाचकांच्या ‘मुंबईचा -हास आता बास’ या मालिकेसंदर्भात
काही सूचना, प्रतिक्रिया असल्यास ८८४७७४१३०१ या क्रमांकावर कळवाव्या. लोकल स्थानकांच्या तक्रारीही या क्रमांकावर पाठवता येतील. स्थानकांतील समस्यांचे व्हिडीओदेखील वाचक या क्रमांकावर पाठवू शकतात.