मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या फैलावामुळे दैनंदिव व्यवहारांवर लावण्यात आलेले निर्बंध अद्याप हटवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अनेक उद्योग व्यवसाय अद्यापही ठप्प आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलांनी आधीच हाती पैसा नसल्याने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, वाढीव विजबिलांविरोधात मनसेने आवाज उठवून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. मनसेच्या या खळ्ळखटॅक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाच्या सीईओनी कृष्णकुंजवर धाव घेतली आहे.अदानी समुहाचे सीईओ आणि शिष्टमंडळाने कृष्णकुंजवर धाव घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटकाळात ग्राहकांना आलेली वीजबिले ही जास्त आहेत. त्यामुळे जनता त्रस्त आहे. अशा परिस्थिती जनतेला बिलांमध्ये सूट देऊन दिलासा द्या, अन्यथा जनतेच्या संतापाचा उद्रेक झाल्यास मनसे सामान्य जनतेच्या बाजूने उभी राहील, असा इशारा राज ठाकरे यांनी अदानी समुहाला दिल्याचे नितीन सरदेसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.दरम्यान, वाढीव वीजबिलांबाबत अदानी समुहाने राज्य सरकारसोबत लवकरात लवकर वाटाघाटी कराव्यात. लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या परिस्थितीमुळे लोकांकडे पैसा नाही, अशा परिस्थितीत वीजबिलांत दिलासा न दिल्याने निर्माण होणाऱ्या परिस्थितीवर कुणाचेही नियंत्रण राहणार नाही, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
वाढीव वीजबिलांवरून खळ्ळखटॅकची भीती; अदानी समुहाच्या सीईओंची कृष्णकुंजवर धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 2:48 PM
वाढीव विजबिलांविरोधात मनसेने आवाज उठवून राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. मनसेच्या या खळ्ळखटॅक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाच्या सीईओनी कृष्णकुंजवर धाव घेतली आहे.
ठळक मुद्देलॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव वीजबिलांमुळे सर्वसामान्य त्रस्त वाढीव विजबिलांविरोधात मनसेने आवाज उठवून राज्यव्यापी आंदोलनास केली सुरुवातमनसेच्या या खळ्ळखटॅक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अदानी समुहाच्या सीईओनी कृष्णकुंजवर धाव घेतली