अहवालातील निष्कर्ष : ७२ टक्के लोकांना यंत्रणांवर विश्वास नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनावर मात करणारी लस दृष्टिपथात असून फेब्रुवारी महिन्यानंतर ती मिळू शकेल असे चित्र देशात निर्माण झाले आहे. मात्र, ही लस उपलब्ध झाली तरी त्याचा माेठ्या प्रमाणात काळाबाजार होईल, अशी भीती ७२ टक्के भारतीयांना वाटत आहे. ही लस परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध झाली तरी ती टोचून घेण्यासाठी घाई करणार नाही असे ५९ टक्के भारतीयांचे म्हणणे आहे. तर, २२ टक्के लोकांना मात्र ती टोचून घेण्याची घाई आहे.
फायझर, माॅर्डेना आणि ऑक्सफर्ड - ॲस्ट्राझेन्का या तीन कंपन्यांच्या लशींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ऑक्सफर्डच्या लशीची निर्मिती कोविडशिल्ड या नावाखाली सुरू आहे. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात ती भारतीयांना ५०० ते ६०० रुपयांत उपलब्ध होईल असे सांगितले जात आहे. ही लस सुरक्षित असल्याचे दावे सीरमतर्फे केले जात आहेत. मात्र, ही लस प्रभावी ठरेल का, त्याचे काही साइड इफेक्ट्स होतील का, याबाबत जनसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने देशभरात सर्वेक्षण केले. त्याला २५,००० जणांनी प्रतिसाद दिला. त्यातून ही माहिती हाती आली आहे.
* ५९ टक्के लाेकांना लस टाेचून घेण्याची घाई नाही
ऑक्टाेबर महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात ६५ टक्के जणांना लस टोचून घेण्याची घाई करणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. तो टक्का आता ५९ पर्यंत कमी झाला आहे. प्रतिसाद दिलेल्या ८ टक्के लोक आरोग्य सेवेतील कर्मचारी असून त्यांनी प्राधान्याने लस मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली.