फेररचनेमुळे उमेदवारांची धांदल
By admin | Published: January 13, 2017 07:06 AM2017-01-13T07:06:16+5:302017-01-13T07:06:16+5:30
मुंबईतील अनेक वॉर्डमधील प्रभागांची फेररचना करण्यात आली. मात्र आता पालिका निवडणुकांच्या तारखा
मुंबई : मुंबईतील अनेक वॉर्डमधील प्रभागांची फेररचना करण्यात आली. मात्र आता पालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांची या फेररचनेमुळे प्रचारासाठी आणि व्यूहरचनेसाठी चांगलीच धांदल उडणार आहे. जुन्या प्रभागांतील काही भाग नवीन प्रभागात तर नवीन प्रभागांतील काही भाग हा अन्य प्रभागांत गेल्याने प्रचार करायचा कसा, असा प्रश्न एच ईस्ट वॉर्डमधील राजकीय पक्षांना पडला आहे.
२0१२ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवेळी एच/ईस्ट वॉर्डमध्ये ११ प्रभाग होते. आता एक प्रभाग कमी झाला आहे. या वॉर्डमध्ये हनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस. ३, सेननगर, व्ही.एन. देसाई रुग्णालय, आग्रीपाडा, वाकोला, डवरीनगर, प्रतीक्षानगर, शिवाजीनगर, लाल बहादूर शास्रीनगर, गाला कॉलेज, धोबी घाट, कलिना, पी अॅण्ड टी कॉलनी, कोर्वेनगर, आय.ए.स्टा वसाहत, विद्यानगरी, कोले कल्याण व्हिलेज, यशवंतनगर, पोलीस प्रशिक्षण मैदान, एमएमआरडीए ग्राउंड, बीकेसी, ज्ञानेश्वरनगर, भारतनगर, गव्हर्नमेंट कॉलनी, एमआयजी कॉलनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, गांधीनगर, गोळीबार, राजे संभाजी विद्यालय, जवाहरनगर, खेरवाडी, शिवाजी गार्डन, गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेज, निर्मलनगर, वांद्रे टर्मिनस, बेहराम पाडा, गरीबनगर, वांद्रे कोर्ट या परिसरांचा समावेश होतो. एच ईस्ट वॉर्डमध्ये आधीपासूनच ८७, ८८, ८९, ९0, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६ असे १० प्रभाग येतानाच त्यामध्ये काही फेरबदल झाले असून, जुन्या प्रभागांतील काही भाग हा अन्य प्रभागात समाविष्ट करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक ८७ मध्ये याच परिसरातील जुना प्रभाग ८६मधील मिलन सब-वे व परिसराचा भाग समाविष्ट झाला आहे. या प्रभागात हनुमान टेकडी, गोळीबार, टी.पी.एस. ३, सेननगर, व्ही.एन. देसाई रुग्णालय येते.
जुना प्रभाग ८८चा काही भाग हा नवीन प्रभाग ९५मध्ये, प्रभाग ८९मधील ज्ञानेश्वरनगर व परिसर प्रभाग ९२मध्ये, प्रभाग ९0मधील काही भाग हा नवीन प्रभाग ९५मध्ये सामील झाला आहे. त्याचप्रमाणे प्रभाग ८८, ९१, ९३, ९६मध्येही फेरबदल झाले आहेत. त्यामुळे या प्रभागातील नगरसेवक, इच्छुकांसह कार्यकर्त्यांची प्रचारासाठी चांगलीच धांदल उडणार आहे.
एच ईस्ट वॉर्डमध्ये सध्या शिवसेनेबरोबरच, काँग्रेस, मनसे यांचे चांगलेच वर्चस्व असून, त्यानंतर भाजपा, सपा, राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर लागतो. गेल्या निवडणुकीत भाजपाचा एकच उमेदवार निवडून आला होता. मात्र यंदा ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्यास भाजपाने या परिसरात पूर्ण ताकदीनिशी लढण्याची तयारी ठेवली आहे. तर शिवसेना, मनसे आणि काँग्रेसकडूनही उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. (प्रतिनिधी)