गौरीशंकर घाळे / मुंबईनिवडणूक आयोगाच्या प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत यंदा विक्रमी मतदान झाले आहे. मतदार यादीतील घोळामुळे तब्बल बारा लाखाहून अधिक लोकांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे आरोप होत असताना झालेल्या या विक्रमी मतदानामुळे राजकीय पक्षांसह उमेदवारांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. वाढीव मतांनी कोणाची लॉटरी लागणार आणि कोणाची बत्ती गुल होणार याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, शिवसेना आणि भाजपाने मात्र हा वाढीव टक्का आमचाच असल्याचा दावा केला आहे. वीस वर्षांहून अधिक काळ एकत्र महापालिकेची सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेना आणि भाजपाने स्वबळाचा नारा दिल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली. दोन्ही पक्षांनी प्रचाराची राळ उडवून दिल्याने मुख्य लढत या दोन पक्षांत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे मतदानाचा वाढलेला टक्का भाजपाच्या पथ्यावर पडणार की शिवसेनेला तारणार, असा सवाल निर्माण झाला आहे. मागील दोन पाच महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का कधीच ५० च्या पुढे गेला नव्हता. त्यातही गेल्या निवडणुकीत अवघ्या ४४.७५ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. वाढीव मतदानाचा नेहमीच भाजपाला फायदा झाला आहे. त्यामुळे मुंबईतील वाढलेल्या या टक्केवारीमुळे भाजपाच महापालिकेत नंबर वन राहील असा दावा भाजपाने केला आहे. तर, मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात झालेले मतदान आमचेच असल्याचा दावा करत शिवसेनेने मुंबई आमचीच असल्याचे म्हटले आहे. दोन्ही पक्षांनी वाढीव मतदानावर आपला हक्क सांगितला असला तरी हा दावा पोकळ असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. जोपर्यंत विभागनिहाय मतदानाची टक्केवारी समोर येत नाही तोपर्यंत वाढीव टक्केवारीचा अर्थ लावणे अशक्य आहे. सामान्य मराठी मतदार, चाळ झोपडपट्टयांतून मतदान खेचून आणण्यात शिवसेनेचा हातखंडा आहे. त्यामुळे या पट्टयातून मतदान वाढलेले असेल तर त्याचा लाभ भाजपाला होण्याची कोणतीच शक्यता नाही. उच्चभ्रू मध्यमवर्गीय, गृहनिर्माण सोसायट्यांतून मतदार मैदानात उतरला तरच त्याचा भाजपाला फायदा मिळणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी विभागानिहाय मतदानाची टक्केवारी जाणून घेण्यासाठी धडपड चालविली आहे.
उमेदवारांच्या जीवाला घोर...
By admin | Published: February 22, 2017 5:18 AM