मुंबई : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट) परीक्षेचे आयोजन न करण्यासह सवलतीचे गुण यावर्षी देऊ नयेत, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढले आहेत. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा रेखाकला परीक्षेच्या अतिरिक्त गुणांना यंदा कोरोनामुळे मुकावे लागणार आहे. यामुळे या गुणांसाठी प्रस्ताव सादर करणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. यासोबतच कला शिक्षक आणि कला अध्यापक संघटनांनी याचा निषेध केला आहे. काही पालक व संघटनांकडून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना या संदर्भात निवेदने दिली आहेत.शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट या विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या परीक्षा आहेत. कला क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी या परीक्षा म्हणजे महत्त्वाची पहिली पायरी असते. या परीक्षेतून मिळणाऱ्या गुणांमुळे विद्यार्थ्यांची दहावीची टक्केवारी वाढते. या संकट कालावधीत या परीक्षांची विद्यार्थ्यांसाठी गरज वाढलेली आहे. दरवर्षी राज्यात व राज्याबाहेर लाखो विद्यार्थी या परीक्षा देत असतात. तसेच एलिमेंटरी व इंटरमिजिएट पास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार दहावी बोर्डाच्या परीक्षेमध्ये वाढीव गुण मिळत असतात. मागील वर्षी अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षांमुळे मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांचा फायदा झाला; परंतु परीक्षा घेतली गेली नाही तर विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. अगोदरच विद्यार्थ्यांना कोरोना संकट कालावधीमुळे प्रत्यक्ष शिक्षण मिळत नाही. त्यामुळे त्यांचा गुणांचा टक्का घसरण्याची शक्यता वाटते, असे मत काही कलाशिक्षक व्यक्त करत आहेत.विद्यार्थीहितासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष एलिमेंटरी व इंटरमिजिएट या परीक्षा इयत्ता सातवी ते दहावीपर्यंत केव्हाही दिलेल्या असतात. मात्र, एकीकडे कोरोनाच्या नावाने या परीक्षा झाल्या नाहीत. या कारणाने विद्यार्थ्यांना कलागुण हे सवलतीचे देण्यात येऊ नयेत हा अतिशय चुकीचा निर्णय घेतला गेला आहे. तंत्रशिक्षण मंत्री यांच्याच कलागुण वाढीव प्रस्ताव मुदतवाढ देण्याच्या पत्रावरून शाळांनी बोर्डाकडे असे प्रस्ताव मुदतीत सादर केलेले आहेत आणि आता अशाच प्रस्तावांना वाढीव कलागुण देण्यात येऊ नये, असा लेखी आदेश काढणे म्हणजे हा अन्याय असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांनी ग्रेड परीक्षेची तयारी करून ते पास असतील तर त्यांना सवलतीच्या गुणांपासून वंचित ठेवणे अन्याय आहे. या सवलतीच्या गुणांची त्यांच्या बोर्डाच्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रावरील नोंद त्यांच्या या क्षेत्रातील पुढील करिअरसाठी आवश्यक आहे.- सुधाकर बोरसे, विभागीय उपाध्यक्ष, राज्य कलाध्यापक महासंघ, मुंबई उपनगर जिल्हाशासकीय चित्रकला परीक्षा प्रमाणपत्रांचा अनेक क्षेत्रांमध्ये उपयोग होतो. त्याचबरोबर दहावीला श्रेणीनुसार वाढीव गुण मिळतात. कोरोना संकटामुळे आजमितीस विद्यार्थ्यांना या परीक्षा साहाय्य ठरू शकतात. परीक्षा न घेणे व गुण न देण्याचा निर्णय घेतल्याने अन्याय झाला आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशीच आमची मागणी आहे. - सई बावनकुळे, विद्यार्थिनी दहावीविद्यार्थी व शिक्षकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून शासनाच्या तंत्रशिक्षण विभागाने इयत्ता दहावीमधील कलाप्रेमी विद्यार्थी व विद्यार्थिनींना सवलतीचे वाढीव कलागुण देण्याबाबत कटू निर्णय घेतला आहे. या परिपत्रकामुळे महाराष्ट्रातील सात ते आठ हजार विद्यार्थी या कला सवलतीच्या गुणांपासून वंचित राहणार आहेत. शिक्षण विभागाने यावर योग्य तो निर्णय घ्यावा.- निखिल साळुंखे, विद्यार्थी दहावी
सवलतीचे कलागुण न मिळाल्याने उत्तीर्णांचा टक्का घसरण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 6:20 AM