Join us

पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींना जात आठवली, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 8:46 PM

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळेच प्रचंड हताश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीचे कार्ड वापरून मतं मागण्याचा अत्यंत केविलवाणा व हीन प्रयत्न सुरु केला आहे

मुंबई -  लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पराभव होत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळेच प्रचंड हताश झालेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीचे कार्ड वापरून मतं मागण्याचा अत्यंत केविलवाणा व हीन प्रयत्न सुरु केला आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.अकलूजच्या सभेत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसने माझी जात काढून शिवीगाळ केली असा आरोप केला, त्यावर सचिन सावंत बोलत होते. नरेंद्र मोदी यांना पराभव दिसू लागल्यामुळेच सत्ता जाण्याच्या भीतीने जातीचा आधार घ्यावा लागत आहेत. बालाकोट, पुलवामाचा वापर करत शहीद जवानांच्या नावावर मतं मागण्याचा प्रयत्न करुन पाहिला, त्याचा काहीही उपयोग होत नाही असे दिसताच ते जातीच्या नावावर मतं मागू लागले आहेत. काँग्रेसने कधीही जातीभेदाचा वापर केलेला नाही. राहुल गांधी यांनी भ्रष्टाचारात गुंतलेल्या तीन-चार मोदींचा उल्लेख केला, त्यात कोणत्याही जातीला शिवीगाळ करण्याचा किंवा अपमान करण्याचा प्रश्नच येत नाही. याही आधी दोनवेळा मोदींनी स्वतःच्या जातीच्या उल्लेख करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे, निवडणुकीमध्ये हारण्याची वेळ आली की ते जातीचा आधार घेतात हे गुजरात निवडणूकीसह दोनदा दिसून आले आहे. असे सावंत यांनी म्हटले आहे.नरेंद्र मोदी यांनीच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचा उल्लेख नाईट वॉचमन असा करून चौकीदार या शब्दाचा वापर केला होता, तेंव्हा त्यांना चौकीदाराचा अपमान वाटला नाही का ? मोदींनी आपल्या जीवाला धोका आहे असे सांगून सहानुभूती मिळवण्याचाही प्रयत्न केला, त्यालाही लोकांचा प्रतिसाद मिळत नाही हे दिसले. पाच वर्षे सत्तेत राहून दलित, आदिवासी, मागास वर्गांच्या कल्याणासाठी मोदींनी काहीही केले नाही, उलट दलितांवरच्या अत्याचारात वाढच झाली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न गुंतागुंतीचा करुन ठेवला, त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही. मोदी सरकारनेच एससीएसटी सबप्लॅन नष्ट केला. रोहित वेमुला प्रकरण, भीमा कोरेगाव प्रकरणातही भाजपाने काय केले हे सर्वांना माहित आहे. संभाजी भिडे, विनायक एकबोटे यांना दलित समाजावर सोडून दंगल घडवली परंतु त्यांची साधी चौकशीही केली नाही. ७० हजारांपेक्षा अधिक कुटुंबांच्या घरात पोलिसांनी घुसून आया-बहिणींसह त्यांच्या कुटुंबांवर खटले भरले त्यावेळी मोदी गप्प का बसले?  राहुल गांधी यांची जात व गोत्र भाजपच्या नेत्यांनीच काढली होती, त्यावेळ मोदी गप्प का बसले ? आपली जात मागास असल्याने काँग्रेस शिवीगाळ करत आहे हे ते म्हणत असले तरी २००० पर्यंत मोदींची जात गुजरातमध्ये मागास म्हणून गणली जात नव्हती, असे सावंत म्हणाले.नरेंद्र मोदींनी पाच वर्ष उद्योगपती मित्रांच्या हितासाठी काढली, पंधरा-पंधरा लाख रुपयांचे सूट घालून हिंडले, दररोज हजारो रुपयांचे मशरूम खातात, तेंव्हा या देशातील गरिब, वंचित शोषित, मागासवर्गीय, आदिवासी हे सर्व उपाशी आहेत याची त्यांना जाणीव होत नाही. डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या वाल्मिकी समाजाला त्यातून अध्यात्मिक आनंद मिळतो असे मोदी म्हणाले होते, याची आठवणही  सावंत यांनी करुन दिली.

टॅग्स :नरेंद्र मोदीसचिन सावंतमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019