Join us

संस्कृती नष्ट होण्याची भीती

By admin | Published: December 12, 2015 1:54 AM

महात्मा गांधी झाडूपुरते मर्यादित आहेत, तर नेहरू कधीचेच विस्मरणात गेले आहेत. या बेफाम परिस्थितीत आपली संस्कृती नष्ट होत असल्याची खंत

मुंबई : महात्मा गांधी झाडूपुरते मर्यादित आहेत, तर नेहरू कधीचेच विस्मरणात गेले आहेत. या बेफाम परिस्थितीत आपली संस्कृती नष्ट होत असल्याची खंत ज्येष्ठ कादंबरीकार किरण नगरकर यांनी व्यक्त केली. शिवाय, याची दखल साहित्यविश्वाने घेतली पाहिजे असेही म्हटले.पॉप्युलर प्रकाशनच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त ‘पॉप्युलरचे अंतरंग’ पुस्तकाचे प्रकाशन किरण नगरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर पॉप्युलरचे संपादक रामदास भटकळ, ग्रंथालीच्या विश्वस्त उषा मेहता, प्रभाकर भिडे, किशोर आरस उपस्थित होते. हे पुस्तक वाचल्यावर समजते की, साहित्याची बॅक स्टोरी किती महत्त्वाची असते याची जाणीव होते. प्रेमात पडण्याचे वय असताना रामदास भटकळ मराठीच्या गद्य आणि पद्याच्या मागे लागला आणि त्यांनी स्वत:ला साहित्यासाठी वाहून घेतले, असे कौतुक नगरकर यांनी केले. पॉप्युलरने वाचकांपर्यंत काय पोहोचवले हे जाणून घेण्यासाठीचे हे पुस्तक आहे. वाचकांना काय मिळाले त्याचा शोध घेणे हा या पुस्तकनिर्मितीमागचा उद्देश आहे, असे भटकळ म्हणाले.प्रकाशन कार्यक्रमानंतर जी. ए. कुलकर्णी यांच्या ‘लक्ष्मी’ या कथेचे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष आणि अभिनेता संदेश कुलकर्णी यांनी अभिवाचन केले. ना. धों. महानोर, कवी ग्रेस यांच्या संगीतबद्ध कविता ज्येष्ठ गायक श्रीधर फडके यांनी सादर केल्या. कुसुमाग्रजांची ‘लिलाव’ कविता श्रीधर फडकेंनी गाऊन सादर केली. तर ‘कानडा राजा पंढरीचा’ या गीताने फडके यांनी या सत्राची सांगता केली. (प्रतिनिधी)