Join us  

भय इथले संपले नाही, तिसऱ्या दिवशी शोधकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 9:40 AM

घटनास्थळी पेट्रोल, डांबर डम्पर आणि चिरडलेल्या वाहनांतून होत असलेल्या गळतीमुळे येथील भीतीदायक परिस्थिती अद्यापही कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : एकामागोमाग एक उभे असलेले अग्निशमन दलाचे बंब... त्यात हाताचा इशारा येताच पाण्याचे प्रेशर कमी-जास्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांची धडपड... भर उन्हात ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेणारे एनडीआरएफचे जवान आणि त्यांच्या दिमतीला गॅस कटरच्या मदतीने जिवाची पर्वा न करता लोखंडी होर्डिंगचे कटिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दमछाक तिसऱ्या दिवशीही सुरू होती. याच दरम्यान थोडासा स्पार्क झाला आणि काहीसा भडका उडाला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ नियंत्रण मिळवत पुन्हा कामाला सुरुवात केली. त्यामुळे घटनास्थळी पेट्रोल, डांबर डम्पर आणि चिरडलेल्या वाहनांतून होत असलेल्या गळतीमुळे येथील भीतीदायक परिस्थिती अद्यापही कायम आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलिस यांच्यासह सुरक्षा कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने येथील राडारोडा उचलण्याचे काम तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत सेन्सर, श्वान पथकाच्या मदतीने अडकलेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, हाती कोणी लागले नाही. होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी खाली पेट्रोलच्या टाक्या आहेत. तसेच, सीएनजी लाइन बंद करण्यात आली आहे. 

दरम्यान, टाक्यांमधील हजारो लिटर पेट्रोल बाहेर काढत गॅस कटरच्या मदतीने काम सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी काम करताना खाली कोणी अडकलेले आहे की नाही? याची चाचपणी करूनच कटिंग सुरू आहे. अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिस यांचे जवळपास १०० हून अधिक जण जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे.

२०-३० जण अडकल्याची भीती 

ढिगाऱ्याखाली आणखी २० ते ३० जण असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. १२० फुटांच्या होर्डिंगखाली चिरडलेल्या वाहनांमधूनही इंधनाची गळती झाली आहे. त्यामुळे सर्व राडारोडा सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. आतापर्यंत २० हून अधिक वाहने बाहेर काढली असून, कोसळलेल्या होर्डिंगचा जवळपास ३० ते ४० टक्के भाग तोडून काढण्यात आला आहे.

 

टॅग्स :घाटकोपरमुंबई