आगीची भीती कायम

By admin | Published: March 10, 2016 02:40 AM2016-03-10T02:40:31+5:302016-03-10T02:40:31+5:30

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा १२३ फुटी डोंगर कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने धोका अद्याप टळलेला नाही़ त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालील मिथेन वायूने

The fear of fire continued | आगीची भीती कायम

आगीची भीती कायम

Next

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा १२३ फुटी डोंगर कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने धोका अद्याप टळलेला नाही़ त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालील मिथेन वायूने पेट घेऊ नये यासाठी डेब्रिज व माती टाकण्यात येत आहे. त्याचबरोबर आग टाळण्यासाठी निरी व आयआयटी मुंबई या संस्थांचेही मार्गदर्शन घेण्यात येत आहे़
कचऱ्याचा प्रश्न बिकट होत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने शहरात नवीन बांधकामांना परवानगी देण्यास स्थगिती दिली आहे़ स्थायीने प्रशासनाकडून खुलासा मागविला होता़ याबाबत स्पष्टीकरण देताना आयुक्तांनी देवनारमध्ये आगीचा धोका कायम असल्याची कबुली दिली.देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याचा ढीग कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, असे त्यांनी सांगितले. तसे झाल्यास त्याखाली असलेल्या मिथेन वायूमुळे कचऱ्याला पुन्हा मोठी आग लागण्याचा धोका आहे़ खबरदारी म्हणून कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर माती व दगड, विटा म्हणजेच डेब्रिज टाकण्याची सूचना निरी व आयआयटीने केली आहे़ त्यानुसार तयारी करण्यात आली असून कचऱ्याचा प्रश्नही लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले़ (प्रतिनिधी)देवनारचा प्रश्न असा सोडविणार
आग लागण्याचा धोका कमी करण्यासाठी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मातीचे अच्छादन टाकणे, उतारावरील कचरा स्थिर करणे, मिथेन वायू संकलित करण्यासाठी गॅस वेलची उभारणी करणे आदीसाठी आयआयटी व निरी येथील तज्ज्ञांची मदत घेण्यात आली आहे़
> उपाययोजना नको; आता डम्पिंग हलवा!
डम्पिंगला वारंवार लागणारी आग आणि येणाऱ्या दुर्गंधीच्या प्रश्नावर उपाययोजना शोधण्याऐवजी येथील डम्पिंग अन्यत्र हलवण्यात यावे, अशी मागणी डम्पिंग ग्राउंडविरोधात आंदोलन करणाऱ्यांनी केली आहे. मुंबईतल्या डम्पिंग ग्राउंडची क्षमता आता संपली आहे. महापालिका केवळ वरवर मलमपट्टी करत असून, मूळ प्रश्नाला बगल देत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पूर्व उपनगरातील डम्पिंगच्या प्रश्नावर लढा देणारे गणेश शेट्टी यांनी सांगितले की, ‘महापालिकेने देवनार डम्पिंग ग्राउंडवर उपाय केले. पण कांजूरमार्गच्या डम्पिंगचे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. कांजूर डम्पिंगवर कचऱ्यासह बांधकाम व्यवसायिकांकडून डेब्रिजही टाकले जात आहे. याकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. प्रश्न मुंबईकरांच्या आरोग्याचा आहे. मुंबईतल्या सर्व डम्पिंग ग्राउंड्सची क्षमता संपली आहे. त्यामुळे पर्यायी जागा शोधणे अत्यंत गरजेचे आहे.’ मुंबई पर्यावरण बचाव कृती समितीचे अध्यक्ष आणि डम्पिंगच्या प्रदूषणावर सातत्याने आवाज उठवणारे सुभाष मराठे-निमगावकर यांच्या म्हणण्यानुसार, ‘देवनार डम्पिंगवरील धुरामुळे स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न केवळ स्थानिक परिसरापुरता मर्यादित राहिला असून, पूर्व उपनगराच्या मुळावर येथील डम्पिंग ग्राउंड उठले आहे. त्यामुळे साधा, सोपा आणि सरळ उपाय म्हणजे देवनार डम्पिंग ग्राउंड महापालिकेने बंद करावे. कित्येक वर्षांपासून स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि पर्यावरणवादी या प्रश्नी आवाज उठवत आहेत. प्रशासनाकडे निवेदन देत आंदोलने करत आहेत. मात्र महापालिका सारवासारव करत आहे.’काही उपाययोजना
बेकायदा प्रवेश रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यात येणार असून त्यासाठी लवकरच निविदा मागविण्यात येतील.
आपत्कालिन मदतीसाठी आगीचे दोन बंब डंपिंग ग्राऊंड परिसरात तैनात ठेवले आहेत.
खासगी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात आली असून २४ तास तीन पाळ्यांमध्ये देखरेख ठेवण्यात येत आहे़
डंपिंग ग्राऊंडमध्ये जाण्यासाठी अंतर्गत रस्ते, रात्रीच्या वेळेत लक्ष ठेवण्याकरिता सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा मनोरे उभारण्यात येणार आहेत़
दोन हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती़
देवनार डंपिंग ग्राऊंवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे़

Web Title: The fear of fire continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.