#KamalaMillsFire: आगीची भीती व्यक्त केली होती - आदित्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 04:45 AM2017-12-30T04:45:09+5:302017-12-30T04:53:09+5:30
मुंबई : कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनेस जबाबदार असणा-यांवर कारवाई व्हायला हवी. येथील फायर आॅडिट होणे गरजेचे होते.
मुंबई : कमला मिल कंपाउंडमधील दुर्घटनेस जबाबदार असणा-यांवर कारवाई व्हायला हवी. येथील फायर आॅडिट होणे गरजेचे होते. जर निष्काळजीपणा झाला असेल तर दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. याबाबत सविस्तर तपास केला जाईल, असे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची कोंडी झाली असून शुक्रवारी दुपारी आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळाला भेट देत आढावा घेतला.
अलीकडेच मी या ठिकाणी आलो होतो तेव्हाच इथल्या अग्निशमन यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असे आदित्य यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जेव्हा मी येथे आलो होतो तेव्हाच, हे अधिकृत आहे का, आग लागल्यास काही सुरक्षेचे उपाय आहेत का, याचीही विचारणा केली होती. शिवाय, गुरुवारी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. कमला मिल, तोडी मिल आणि रघुवंशी मिल या तीनही ठिकाणी कोणतीही दुर्घटना घडल्यास फायर इंजीनलादेखील घुसण्याची जागा नाही. त्यामुळे तेथे फायर आॅडिट होणे गरजेचे असल्याचे महापौरांना म्हटले होते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या प्रकरणी ज्यांनी हयगय केली त्यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे. मिलचे मालक किंवा हॉटेल मालक यांच्यावरही कारवाई केली जाईल, असे आदित्य यांनी सांगितले. दरम्यान, खुद्द आदित्य यांनी अशा दुर्घटनेबाबत भाकीत केले असेल तर तातडीने पावले का उचलली गेली नाहीत, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
>ठाकरे कुटुंबीयच जबाबदार - नितेश राणे
या दुर्घटनेला मुंबई महापालिका आणि ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत. अशा दुर्घटनेनंतरही महापालिकेचे अधिकारी कसलीच कारवाई करत नाहीत. फक्त चौकशी समितीचे नाटक होते. कारवाई होणार नाही याची खात्री असल्यामुळे हॉटेलमालक सर्रास नियम मोडतात, असे नितेश राणे यांनी सांगितले.