हत्याकांडांमुळे भांडुपमध्ये दहशत, आठवड्याभरातील पाचवी हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 06:13 AM2018-03-27T06:13:13+5:302018-03-27T06:13:13+5:30
श्रीवर्धनमधून सहा जणांना अटक
मुंबई/श्रीवर्धन : भांडुपमध्ये पुन्हा एकदा छोट्या-मोठ्या टोळक्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नरेश शेट्टीची चॉपरने रिक्षातच हत्या केली. आठवड्याभरातील ही पाचवी हत्या आहे. या प्रकरणी श्रीवर्धनच्या समुद्रकिनाऱ्यावरून ६ जणांना अटक करण्यात आली आहे.
बहिणीला लग्नाची मागणी घातल्याच्या रागात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास शेट्टीची निर्घृण हत्या करण्यात आली. रविवारी टेंभीपाडा परिसरातच रिक्षात त्याचा मृतदेह आढळला. शेट्टी याच्यावर हत्येचा आरोप आहे. या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला होता. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून भांडुप पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात या हत्येतील संशयित समुद्रमार्गे श्रीवर्धन येथे गेल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, भांडुप पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक के.बी. खोत यांच्या मार्गदर्शनाखालील पथक श्रीवर्धनमध्ये दाखल झाले. श्रीवर्धन पोलिसांच्या मदतीने त्यांनी हर्षद प्रकाश केगडे (२९), सुमित काडवे (२६), जय सीताराम वाजे (२१), संकेत संजय खैरे (२४), महेश विलास जाधव व नयनेश रविकांत खानविलकर यांना अटक केली आहे.
झकेरिया कम्पाउंड येथे फेरीवाल्यांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो याबाबत पोलीस आणि पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करण्यात आली होती. तसेच घटनेच्या चार दिवसांपूर्वी १०० रुपयांच्या हफ्त्यावरून शाहबाजचा फेरीवाल्यांसोबत वाद झाला होता. याच वादात त्याने फेरीवाल्यांना पट्ट्याने मारहाण केली होती. फेरीवाल्यांच्या तक्रारीवरून भांडुप पोलीस तेथे धडकले. मात्र या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले नाही. तसेच यापूर्वीही शाहबाजविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या होत्या. घटनेच्या दिवशी त्याच फेरीवाल्यांच्या जागेवर शाहबाजने गाडी पार्क केली होती. याच रागात शाहबाजसह तिघांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी वेळीच या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले असते, तर हे हत्याकांड रोखता आले असते, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता तरी येथून फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
टोळ्या सक्रिय...
भांडुपमध्ये पुन्हा एकदा टोळ्या सक्रिय होताना दिसत आहेत. प्रत्येक जण स्वत:चा प्रभाव वाढविण्यासाठी हाणामारीवर उतरत आहे. त्यामुळे भांडुपकर दहशतीखाली आहेत. टोळक्यांचे अंतर्गत वॉरही सुरू झाले आहेत.संतप्त नागरिकांचा मोर्चा
भांडुपमधील या हत्याकांडामुळे दहशतीखाली असलेल्या भांडुपकरांनी
सोमवारी सायंकाळी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला. त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.