Join us

मुंबईला खलिस्तानी अतिरेकी हल्ल्याची भीती, पोलिसांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 7:02 AM

Terrorist attack : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरला मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल.

मुंबई : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खलिस्तान्यांकडून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून वर्तविण्यात आल्याने सर्वत्र हाय अलर्ट घोषित करण्यात आला असून, पोलिसांच्या साप्ताहिक सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत.गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरला मुंबईसह महाराष्ट्रात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असेल.

गेल्या गुरुवारी लुधियाना न्यायालयात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत खलिस्तानी अतिरेक्यांकडून आत्मघातकी हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेकडून वर्तविण्यात आली आहे. या दहशतवादी गटाला पाकिस्तानच्या आयएसआय या दहशतवादी गुप्तहेर संघटनेचे पाठबळ असल्याचे उघड झाले आहे.

त्यामुळे मुंबईतील सार्वजनिक मालमत्ता, तसेच गर्दीची ठिकाणे या हीट लिस्टवर असतील, अशी भीती आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अँटिसॅबटॉजची टीम, बॉम्बशोधक आणि नाशक पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखा, स्थानिक पोलीस ठाणी आणि अतिरेकीविरोधी विभागालाही सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मोठ्या पार्ट्यांच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली आहे, तसेच कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आणि समूह संसर्ग वाढवणाऱ्या पार्ट्यांच्या आयोजकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, सामान्य नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त आणि प्रवक्ता उपायुक्त चैतन्य यांनी मुंबईकरांना केले आहे.

टॅग्स :मुंबईदहशतवादीपोलिस