परदेशी विमान सेवांवर बंदी घाला : ५० टक्के भारतीयांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विषाणूच्या नव्या आवृत्तीने ब्रिटन, दक्षिण अफ्रिकेसह सभोवतालच्या काही देशांसह जगभरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भारतीय नागरिकांनीही त्याचा धसका घेतला असून परदेशात ये-जा करणारी विमानसेवा तातडीने बंद करावी, असे मत ५० टक्के लोकांनी व्यक्त केले आहे. तर, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने १४ दिवस क्वारंटाइन राहण्याची सक्ती करावी, अशी आग्रही मागणी ४१ टक्के लोकांनी केली.
दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला असून त्याचा फैलाव वेगाने होत आहे. त्यामुळे या देशांत चौथ्या टप्प्यातील कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भारतातील सरकारी यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. चीनमधून फैलावलेल्या कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी पहिल्या टप्प्यात ठोस प्रयत्न न झाल्याने देशातील संसर्गाचे प्रमाण वाढले, असे आरोप सातत्याने होत होते. त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोरोनाच्या या नव्या प्रकाराला रोखण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे, असे मत देशातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर लोकल सर्कल या ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने लोकांचा कल जाणून घेतला. त्यात पाश्चिमात्य देशांप्रमाणे भारतानेही परदेशातील विमान सेवा बंद करावी, अशी मागणी पुढे आली. केंद्र सरकारनेही सोमवारी दुपारी तीच भूमिका घेत ब्रिटनहून येणाऱ्या विमानांवर निर्बंध जारी केले आहेत.
मार्च महिन्यात देशभरात सरकारने लाॅकडाऊन जाहीर होण्यापूर्वी १० मार्च रोजी लोकल सर्कलने एक सर्वेक्षण केले होते. त्यात कोविडची लागण झालेली नाही, असे प्रमाणपत्र असलेल्या लोकांनाच देशात प्रवेश द्यावा, असे मत बहुसंख्य लोकांनी मांडले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी सरकारने ११ दिवसांनंतर केली होती.
...............................................