नागरिकांनो घाबरू नका, मुंबईत कर्फ्यू नाही; विश्वास नांगरे-पाटील यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 06:59 AM2022-12-04T06:59:02+5:302022-12-04T06:59:17+5:30
अफवांमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.
मुंबई : नागरिकांनो घाबरून जाऊ नका, कारण मुंबईत कोणताही कर्फ्यू पोलिसांकडून लावण्यात आलेला नाही, अशी माहिती शनिवारी सहपोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांनी एका व्हिडीओमार्फत शनिवारी दिली. त्यामुळे शहरात संचारबंदी लागू झाल्याच्या खोट्या अफवांवर पूर्णविराम लागले आहे.
नांगरे-पाटील यांनी एक निवेदन जारी केले की, शहरात कोणताही कर्फ्यू लागू करण्यात आलेला नाही. शहरात संचारबंदी लागू झाल्याच्या अफवा खोट्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. बेकायदेशीर मेळावे आणि रॅली टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी ३ ते १७ डिसेंबरपर्यंत शहरात निर्बंध लादले आहेत आणि हे आदेश ही एक नित्याची प्रक्रिया आहे. ज्याचा दर १५ दिवसांनी आढावा घेतला जातो.
सी.आर.पी.सी ११४ वर स्पष्टीकरण
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) December 3, 2022
मुंबईमध्ये कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू झाल्याविषयी काही अफवा समाजमाध्यमांवर पसरविल्या जात आहेत
सह पोलीस आयुक्त (का.व सु.) @vishwasnp यांनी या दर १५ दिवसांनी लागू करण्यात येणाऱ्या जमावबंदीविषयी माहिती दिली,तसेच अफवा न पसरवण्याचे आवाहन केले pic.twitter.com/dhbCZ9HWHr
एका व्हिडीओ संदेशामार्फत नांगरे-पाटील म्हणाले की, मुंबईत कर्फ्यू नाही; पण शांतता सुनिश्चित करण्यासाठी आमच्याकडून हे पाऊल नियमितपणे उचलले जाते. अफवांमुळे लोकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, असे त्यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे. पाटील पुढे म्हणाले, पोलिसांच्या परवानगीशिवाय रॅली काढणाऱ्या आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी दर १५ दिवसांनी हा आदेश लागू केला जातो. या आदेशाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी कोणताही संबंध नाही. शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, राजकीय कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांवर अशा आदेशाचा परिणाम होणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.