Join us

विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 9:01 AM

नार्वेकर आणि जयंत पाटील यांचे लहानमोठ्या अन्य पक्षांमधील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.

MLC Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एक अतिरिक्त उमेदवार मैदानात असल्याने नक्की कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभूत होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मतांची गोळाबेरीज करण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून त्यादृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एका-एका मताला महत्त्व प्राप्त झालं आहे.

विधानपरिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान २३ आमदारांची मते मिळणे आवश्यक आहे. ११ जागांसाठी महायुतीकडून भाजप पाच, शिंदेसेना दोन आणि अजित पवार गट दोन असे नऊ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने एक उमेदवार उभा केला आहे, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने शेकापच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे. यात उद्धवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांना मैदानात उतरवले गेल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत छोट्या पक्षांना मोठे महत्त्व आले आहे.बहुजन विकास आघाडीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

बविआचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली तसेच मिलिंद नार्वेकर यांनीही हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यामुळे हितेंद्र ठाकूर यावेळी भाजपला साथ देतील की उद्धवसेनेच्या नार्वेकरांना? याविषयीची चर्चा आता सुरू आहे.

कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

अजित पवार गटाचे शिवाजीराव गर्जे, शेकापचे (शरद पवार समर्थित) जयंत पाटील, उद्धव सेनेचे मिलिंद नार्वेकर किंवा भाजपचे पाचपैकी एक यांच्यातील कोणीही एक जण पराभूत होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. नार्वेकर आणि जयंत पाटील यांचे लहानमोठ्या अन्य पक्षांमधील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत, त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. खोत, गोरखेंसह भाजपच्या पाचही उमेदवारांची मुख्य भिस्त ही पक्षाकडे असलेल्या ११२ मतांवर आहे.

दरम्यान, भाजपला बाहेरून किमान ३ ते ५ मते खेचून आणावी लागतील. त्यासाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी रणनीती आखली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

टॅग्स :विधान परिषद निवडणूक 2024विधान परिषदमहाविकास आघाडीभाजपा