Join us  

ट्रान्स हार्बर लिंकमुळे शिवडी भागात वाहतूक कोंडीची भीती

By जयंत होवाळ | Published: January 04, 2024 7:49 PM

ट्रान्स हार्बर लिंकचे  काम पूर्ण झाले असून लवकरच  पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे.

मुंबई : शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर  लिंक पूर्ण झाल्यानंतर शिवडी आणि कॉटन ग्रीन भागात वाहतूक कोंडी होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली असून संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने आणि पालिकेने आताच उपाय योजना करण्यास सुरुवात करावी  अशी मागणी करण्यात आली  आहे. 

ट्रान्स हार्बर लिंकचे  काम पूर्ण झाले असून लवकरच  पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण होणार आहे. या सागरी सेतूवरून येणारी वाहने शिवडी गाडीअड्डा ते कॉटन ग्रीन फायर स्टेशन या ठिकाणाहून  मार्गस्थ होणार आहेत. कॉटन ग्रीन फायर स्टेशन शेजारीच मुंबई पोर्ट ट्रस्टच्या पे अँड पार्किंगच्या जागा आहेत. या ठिकाणी रोज हजारो वाहने पार्किंगसाठी ये-जा करत असतात. दोन्ही ठिकाणाहून अधिक प्रमाणात वाहनांचा ओघ वाढल्यास झकेरिया बंदर रोड ,नाथ पै मार्ग, दत्ताराम लाड मार्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू शकते. 

बीपीटी मध्ये पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांना जर रे रोड वरून ये-जा करण्याची व्यवस्था करून देण्यात आली किंवा कॉटन ग्रीन फायर स्टेशन येथून फक्त  शिवडी  न्हावा शेवा पुलावर जाणाऱ्या वाहनांना प्रवेश दिल्यास भविष्यात मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूक कोंडी टळू शकेल, याकडे शिवसेना उद्धव ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी लक्ष वेधले आहे. त्यासंदर्भात त्यांनी 'एफ' दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पत्र देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे.  

टॅग्स :वाहतूक कोंडीमुंबई