मतमोजणीत गडबड व्हायची भीती; विरोधी पक्ष दक्ष राहून ठेवणार लक्ष
By दीपक भातुसे | Published: June 3, 2024 10:58 AM2024-06-03T10:58:03+5:302024-06-03T10:58:53+5:30
महाविकास आघाडीची सतर्क भूमिका; मतमोजणी प्रतिनिधींना दिले खास प्रशिक्षण
मुंबई : निवडणूक आयोगाने मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यास केलेला उशीर, त्यात ३ ते ६ टक्क्यांची झालेली वाढ या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या दिवशी विरोधी पक्षांनी दक्ष राहण्याचे ठरवले आहे. वाढीव टक्केवारीनंतर आता मतमोजणीत गडबड होऊ शकते, अशी शंका विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी प्रत्येक उमेदवाराच्या मतमोजणी प्रतिनिधीने दक्ष राहून बारीक लक्ष ठेवावे, अशा स्पष्ट सूचना महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख पक्षांनी दिल्या आहेत. यासाठी या तीनही पक्षांनी कार्यशाळा व प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.
उद्धव सेनेकडून कार्यशाळा
मतमोजणीच्या दिवशी काय काय काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे, तांत्रिक बाबी कोणत्या असतील, या सगळ्यांचे मतमोजणी प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी उद्धव सेनेकडून कार्यशाळा घेण्यात आली होती.
या कार्यशाळेत सर्व मतमोजणी प्रतिनिधींनी मतमोजणी पूर्ण होईपर्यंत पूर्ण प्रक्रियेवर लक्ष देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शरद पवार गटाकडून उमेदवारांवर जबाबदारी
शरद पवार गटानेही मतमोजणी प्रतिनिधींचे प्रशिक्षण घेतले. त्याची जबाबदारी त्या मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष व उमेदवारांवर दिली होती. पक्षाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार या मतमोजणी प्रतिनिधींचे प्रशिक्षण घेण्यात आले आहे.
काँग्रेसचे प्रशिक्षण
दिल्लीवरून आलेल्या सूचनेनुसार काँग्रेस लढवत असलेल्या प्रत्येक मतदारसंघात पक्षाने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. प्रतिनिधींना हे प्रशिक्षण देण्यासाठी मतदारसंघात खास टीम तयार केल्या होत्या.
वरिष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली होती. सर्व मतदारसंघात हे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का, याचा आढावा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतला.
मतमोजणी प्रतिनिधींना कोणत्या सूचना केल्या ?
प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याचा काही वेळ आधीच मतमोजणी केंद्रावर पोहचणे
ईव्हीएम मशीनचे सील पडताळून पाहावे
मशीन आणि सीपीयू आयडी तपासावा
मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर ईव्हीएमवर एकूण किती मतदान झाले. त्याची नोंद असणारा फॉर्म १७ सी हा ईव्हीएम सील केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराच्या मतमोजणी प्रतिनिधीला दिला जातो. मतमोजणीच्या दिवशी फॉर्म १७ सीमध्ये नमूद असलेले आकडे आणि ईव्हीएमवरील आकडे जुळतात का, याची खात्री करावी.
कुठे तफावत आढळली, तर मतमोजणी प्रतिनिधी म्हणून प्रक्रिया सुरू करण्यासाठी सही देऊ नका, तत्काळ आक्षेप नोंदवा.
संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यासंदर्भातील फॉर्म भरून घेईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडायचे नाही.