आॅक्सिटॉसीन इंजेक्शनच्या खुल्या विक्रीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 06:10 AM2018-08-28T06:10:59+5:302018-08-28T06:11:38+5:30

आॅल फूड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनची एफडीएकडे तक्रार

Fear of open sale of oxytocin injection | आॅक्सिटॉसीन इंजेक्शनच्या खुल्या विक्रीची भीती

आॅक्सिटॉसीन इंजेक्शनच्या खुल्या विक्रीची भीती

googlenewsNext

मुंबई : प्रसूतीच्या वेळी होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी देण्यात येणाºया आॅक्सिटॉसीन या इंजेक्शनची खुली विक्री करण्यात येत आहे. हे इंजेक्शन प्रिस्क्रिप्शनशिवाय पुरवू नये, असा आदेश असून सर्रास विक्री होत आहे. या इंजेक्शनचा वापर केवळ डॉक्टरांकडूनच व्हावा, असेही त्यात म्हटले आहे. औषधांच्या दुकानात या इंजेक्शनच्या होणाºया विक्रीमुळे याचा दुरुपयोग होण्याची भीती आॅल फुड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनने व्यक्त केली आहे. याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे, यावर योग्य निर्बंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

आॅक्सिटॉसीन इंजेक्शन औषधांच्या दुकानातून मिळावे, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत हे इंजेक्शन केवळ रुग्णालये आणि डॉक्टरांनाच उपलब्ध होत होते. मात्र, अशा उपलब्धतेवर आॅल फुड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी आक्षेप घेतला आहे. काही औषध दुकान संघटनांच्या मागणीमुळे आॅक्सिटॉसीन इंजेक्शन औषध दुकानांमध्ये उपलब्ध होण्यास खुले केले आहे. हे औषध दुकान संघटनांचे दबावतंत्र असून याचा विरोध करत असल्याचे पांडे यांनी सांगितले.
आॅक्सिटॉसीन इंजेक्शनचा वापर महिलांसाठी केला जात असून प्रसूतीच्या वेळी होणाºया अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी हे दिले जाते. त्यामुळे रुग्णालयांमधील डॉक्टरच त्याचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात, असे मत केईएम रुग्णालयाच्या प्रा. डॉ. कामाक्षी भाटे यांनी सांगितले. तर अभय पांडे यांच्या मते काही जण या इंजेक्शनचा दुरुपयोग करतात. शेतातील भाज्यांची आणि फळांची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आॅक्सिटॉसीन इंजेक्शनचा शिडकावा भाज्यांवर केला जातो. यामुळे उत्पादन क्षमता वाढते. यामुळे भाज्यांची, फळांची वाढ त्वरित होते. तसेच दूध देणाºया प्राण्यांना हे इंजेक्शन दिल्यास त्यांचेदेखील उत्पादन वाढते. इंजेक्शनचा वापर करून अवाजवी उत्पादन केलेल्या भाज्या किंवा दुग्धजन्य पदार्थ याचे ग्रहण केल्यास आजार होण्याची शक्यता आहे. कर्करोगासारखा दुर्धर रोग होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले असल्याची माहिती आॅल फुड अ‍ॅण्ड ड्रग लायसन्स होल्डर फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी दिली.

आॅक्सिटॉसीनसारख्या इंजेक्शनची निर्मिती कर्नाटक अ‍ॅन्टीबायोटिक प्रायव्हेट लिमिटेड या एकमेव सरकारी कंपनीकडून होते. आतापर्यंत हीच कंपनी प्रत्येक डॉक्टरला, रुग्णालयात पुरवठा करते. मात्र, नुकत्याच जारी झालेल्या सूचनेनुसार ती औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामुळे चिंता वाढली असल्याचे अभय पांडे यांनी सांगितले.

Web Title: Fear of open sale of oxytocin injection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.