अंधेरीकरांना भांडुपच्या पुनरावृत्तीची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 04:32 AM2018-05-03T04:32:12+5:302018-05-03T04:32:12+5:30

अंधेरी पूर्वेकडील गणेश नगर येथील सार्वजनिक शौचालय खचल्यामुळे भांडुप शौचालयाची पुनरावृत्ती होऊ नये, याचा धसका रहिवाशांनी घेतला आहे.

The fear of the repeated recurrence of darkness | अंधेरीकरांना भांडुपच्या पुनरावृत्तीची भीती

अंधेरीकरांना भांडुपच्या पुनरावृत्तीची भीती

googlenewsNext

सागर नेवरेकर 
मुंबई : अंधेरी पूर्वेकडील गणेश नगर येथील सार्वजनिक शौचालय खचल्यामुळे भांडुप शौचालयाची पुनरावृत्ती होऊ नये, याचा धसका रहिवाशांनी घेतला आहे. गेल्या ९ महिन्यांपासून सरकारकडे शौचालय पुनर्बांधणी संदर्भात अनेक पत्रव्यवहार करण्यात आले. शौचालयाची पडझड, खचलेले शौचकूप, दुर्गंधी, घुशींची वाढती संख्या, पाण्याची गैरसोय, उघड्यावर असलेल्या विजेच्या तारा अशा अनेक समस्यांचा रहिवाशांना सामना करावा लागत आहे. मात्र, प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
म्हाडाने गणेश नगरातील सार्वजनिक शौचालय १९८९ साली बांधले. त्यानंतर २००४ साली त्याची डागडुजी करण्यात आली व ते पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले. मात्र, आता त्यातील दोन शौचकूप जमिनीत तीन ते चार इंचांपर्यंत खचले आहेत. हे शौचालय नव्याने बांधले जावे, यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून पालिकेकडे रहिवासी पत्रव्यवहार करीत आहेत.
२५० ते ३०० कुटुंबांमागे १८ शौचकूप आहेत; परंतु त्यातील २ शौचकूप खचल्यामुळे ते बंद आहेत. शौचालयात दुर्गंधीचे वातावरण पसरले आहे. चहूबाजूंनी वस्ती असल्याने त्या दुर्गंधीचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागतो.
आमदारांच्या फंडातून शौचालय बांधण्याचे पत्र म्हाडाने महापालिकेला दिले होते. शौचालय कसे हवे, याचा आराखडा वास्तुरचनाकाराने म्हाडा व आमदारांना दिला आहे. आम्ही आमच्या पद्धतीने शौचालय बांधू, असे म्हाडाने सांगितले होते; परंतु म्हाडाने त्यांचे आराखडे दाखवले नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आता काही विपरीत प्रसंग घडण्याआधी त्वरित शौचालयांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दयानंद सावंत यांनी केली आहे.

रहिवाशांच्या सोयीनुसार बांधकाम व्हावे
शौचालयाची समस्या घेऊन रहिवासी एका महिन्यापूर्वी आले होते. त्याचवेळी शौचालयांच्या पुनर्बांधणीसाठी २२ लाखांचा निधी आमदार फंडातून देण्यात आला आहे. तेथील रहिवाशांना त्यांच्या सोयीनुसार शौचालय बांधून हवे आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून शौचालय बांधण्यासाठी आमदार निधीचा वापर करावा, असे सांगण्यात आले आहे. आता म्हाडा आणि रहिवासी यांच्यात कोणत्या आराखड्याद्वारे शौचालय बांधायचे यावर चर्चा सुरू आहे. रहिवाशांच्या सोयीनुसार शौचालय बांधण्यात यावे, असे प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
-रमेश लटके, स्थानिक आमदार

पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू
गेल्या आठवड्यामध्ये गणेश नगरच्या शौचालयाची टेंडर नोटीस काढण्यात आली आहे. शौचालयाच्या पुनर्बांधणी कामाची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच शौचालयाचे काम सुरू होईल. नगरसेवकांच्या फंडातून शौचालयाची डागडुजी होऊ शकते. ती डागडुजीही करण्यात आली होती. शौचालयाची टाकी खूप जुनी आहे.
- सदानंद परब, स्थानिक नगरसेवक


म्हाडा व महापालिका यांच्यात समन्वय नाही. म्हाडा खासदार व आमदार निधीतून शौचालय बांधते, तर महापालिका नगरसेवकांच्या निधीतून शौचालयांची कामे करते. २००२ साली शौचालय बांधण्याच्या कामात समान धोरणाचा शासन निर्णय काढण्यात आला होता; परंतु त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
म्हाडाकडून केलेले बांधकाम हे लोडबेअरिंगचे असते. या बांधकामांचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असतो. ही बांधकामे तथाकथित मजूर सहकारी संस्थांच्या मदतीने उरकली जातात.
शौचालयांत पाणी व विजेची गैरसोय असते. २०१३ साली महापालिकेने केलेल्या सर्वेनुसार ७८ टक्के शौचालयांना पाणीपुरवठा नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली, तर ५८ टक्के शौचालयांत विद्युत पुरवठा नसल्यामुळे सूर्यास्तानंतर ही शौचालये अमलीपदार्थांचा अड्डा बनली. तसेच भटकी कुत्री आणि दारूच्या गुत्थाचे आश्रयस्थान बनत असल्याचे निदर्शनास आलेले आहे.
राज्याच्या पाणीपुरवठा, स्वच्छता विभाग व नियोजन विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे शौचालय बांधण्याच्या कामात समान धोरण अंमलात आणावे, असे २००२ मध्ये ठरलेले असतानादेखील आजही महापालिका व म्हाडाच्या शौचालय बांधण्याच्या कामात कोणतेही समान धोरण नाही.

घुशी बाहेर येतात
शौचालयाला चहूबाजूंनी घुशी लागल्या आहेत. शौचकूपातून घुशी बाहेर येतात. महिलांचा एक शौचकूप खचलेला आहे. दरवाजे तुटलेले आहेत. महिलांचे दोन - तीन शौचकूपच चांगल्या स्थितीत आहेत. त्यामुळे ही शौचकूपे अपुरी पडत आहेत. - अश्विनी चराटकर, स्थानिक रहिवासीपरिसरात दुर्गंधीचे वातावरण
शौचालय गेल्या कित्येक महिन्यांपासून साफ न केल्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरू लागले आहे. तसेच आजूबाजूला रहिवासी राहत असून, त्यांना दुर्गंधीमुळे अनेक आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. काही दिवसांपूर्वी महिला शौचालयातील शौचकूप फुटून मोठा अपघात होता होता टळला. सकाळच्या वेळेत प्रचंड दुर्गंधी पसरते.
-स्मिता मालवणकर,
स्थानिक रहिवासी

Web Title: The fear of the repeated recurrence of darkness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.