दुसऱ्या लाटेच्या धास्तीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मुंबईकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:06 AM2021-06-28T04:06:19+5:302021-06-28T04:06:19+5:30
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा दुष्परिणाम; दोन महिन्यांत ६९ टक्के घट, मे महिन्यात केवळ ५४,१८५ परदेशी प्रवाशांची नोंद लोकमत न्यूज नेटवर्क ...
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेचा दुष्परिणाम; दोन महिन्यांत ६९ टक्के घट, मे महिन्यात केवळ ५४,१८५ परदेशी प्रवाशांची नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या वर्दळीमुळे गजबजून जाणारे मुंबई विमानतळ सध्या सामसूम आहे. काेराेनाच्या दुसऱ्या लाटेच्या धास्तीमुळे परदेशी प्रवाशांनी पाठ फिरवल्याने, गेल्या दोन महिन्यांत मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत ६९ टक्क्यांची घट झाली. मे महिन्यात येथून केवळ ५४ हजार १८५ परदेशी प्रवाशांनी ये-जा केल्याची माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अहवालातून समोर आली.
विविध देशांनी भारतीय प्रवाशांवरचे निर्बंध शिथिल केल्यानंतर, फेब्रुवारीपासून मुंबई विमानतळावरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या पूर्वपदावर येत असल्याचे चित्र निर्माण झाले. मार्चमध्ये तर जवळपास १ लाख ७७ हजार प्रवाशांची नोंद झाली, परंतु एप्रिलमध्ये कोरोनाचा प्रकाेप पुन्हा सुरू झाल्याने परदेशी प्रवाशांनी मुंबईकडे पाठ फिरविली. मार्चच्या तुलनेत एप्रिल आणि मे महिन्यातील प्रवासी संख्येत ६९.२२ टक्क्यांची घट झाली. कोरोनापूर्व काळाचा विचार करता, मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या ९६ टक्क्यांनी कमी झाली. गेल्या वर्षी जानेवारीत १२ लाख २४ हजार ८२७ परदेशी प्रवाशांची नोंद करण्यात आली होती.
देशातील एकूण आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येतही दुसऱ्या लोटेत जवळपास ७० टक्क्यांची घट नोंदविण्यात आली. विविध राज्यांतील विमानतळांवरून मार्चमध्ये १६ लाख १० हजार, एप्रिल १३ लाख ५० हजार आणि मे महिन्यात केवळ ४ लाख ९७ हजार परदेशी प्रवाशांनी ये-जा केली.
* मुंबईतील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्या
मार्च - १ लाख ७६ हजार ४४४
एप्रिल - १ लाख ३७ हजार २१३
मे - ५४ हजार १८५
* कारणे काय?
- नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध वर्षभरापासून कायम ठेवल्याने अडचणी.
- यूके, यूएई, कॅनडासह काही महत्त्वाच्या देशांनी दुसऱ्या लाटेच्या धास्तीने भारतीय प्रवाशांवर पुन्हा घातलेली बंदी.
- भारतात १४ दिवसांपेक्षा अधिक काळ वास्तव्य केलेल्यांवरही विविध देशांत लागू असलेले निर्बंध.
- दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येनेही उच्चांक गाठल्याने, भारतीय व्हेरिएंटच्या भीतीने अनेकांनी टाळलेला प्रवास.
......................................