सरकारमधून बाहेर पडल्यास फुटीची भीती, शिवसेनेची द्विधा मन:स्थिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 01:45 AM2017-09-29T01:45:19+5:302017-09-29T01:45:42+5:30

राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेची द्विधा मन:स्थिती कायम असून शनिवारच्या दसरा मेळाव्यात सरकारशी संबंध तोडले तर पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडू शकते, ही भीती शिवसेना नेतृत्वाला सतावत असल्याचे समजते.

The fear of separation from the government, fear of Shiv Sena remained in the state of mind | सरकारमधून बाहेर पडल्यास फुटीची भीती, शिवसेनेची द्विधा मन:स्थिती कायम

सरकारमधून बाहेर पडल्यास फुटीची भीती, शिवसेनेची द्विधा मन:स्थिती कायम

Next

- दसरा मेळाव्यातील उद्धव यांच्या भाषणाकडे शिवसैनिकांचे लक्ष

मुंबई : राज्य सरकारमधून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेची द्विधा मन:स्थिती कायम असून शनिवारच्या दसरा मेळाव्यात सरकारशी संबंध तोडले तर पक्षात मोठ्या प्रमाणात फूट पडू शकते, ही भीती शिवसेना नेतृत्वाला सतावत असल्याचे समजते.
‘एकदाचे सरकारमधून बाहेर पडा. ज्यांना भुजबळ, राणे व्हायचे असेल ते होतील; पण सच्चे शिवसैनिक जाणार नाहीत आणि तेच पक्ष वाढवतील,’ असा मोठा दबाव कट्टर शिवसैनिकांकडून येत आहे. त्यात शिवसेनेचे तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांचाही समावेश आहे. ‘राज्य सरकारमध्ये आमची कामेच होत नाहीत. शिवसैनिकांना एसईओ देखील केले जात नाही. आपल्या मंत्र्यांकडे महत्त्वाची खातीदेखील नाहीत; मग सरकारमध्ये राहायचे कशाला,’ असा शिवसैनिकांचा सवाल आहे.

दुसरीकडे पक्षाचे नेते, मंत्री, आमदार हे कोणत्याही परिस्थितीत सरकारमधून बाहेर पडा, अशी आग्रही आणि खुली भूमिका घेताना अद्याप दिसलेले नाहीत. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नेमका कोणाचा आवाज ऐकून निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे. ‘आज बाळासाहेब असते तर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय एका मिनिटात घेतला असता,’ अशी प्रतिक्रिया विदर्भातील एका जिल्हाप्रमुखाने लोकमतशी बोलताना दिली.

शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याचा कोणताही निरोप आमदार, खासदार, जिल्हाप्रमुखांना अद्याप मातोश्रीवरून देण्यात आलेला नाही. त्यामुळे दसरा मेळाव्यात नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीसांना टीकेचे लक्ष्य करीत ताणायचे, पण तुटू द्यायचे नाही, अशी बोटचेपी भूमिका घेतली जाऊ शकते.

का बाहेर पडू शकते सेना?
- विधानसभा निवडणुकीच्या दोन वर्षे आधी निर्णय घेतला तर स्वबळावर तयारी करता येईल. सरकारमधून बाहेर पडल्याने पक्षाचे काही आमदार, खासदार फुटले तरी ‘डॅमेज कंट्रोल’ करायला दोन वर्षे मिळतील. आताच बाहेर पडल्यास पक्षांतर बंदी कायद्यामुळे फारशी फाटाफूट होणार नाही.
- भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र व राज्य सरकारविरुद्ध आंदोलनाची खुली भूमिका घेऊन रस्त्यावर उतरता येईल.
- प्रत्येक मतदारसंघात आमदार, खासदारकीचे उमेदवार शोधून त्यांना बळ देता येईल. लहानमोठ्या संघटना, पक्ष यांना मित्र म्हणून जोडता येण्यास वेळ मिळेल.

सत्तेत राहण्याची कारणे?
- सत्तेतून बाहेर पडल्यास पक्षफुटीची भीती. काही आमदार, खासदार हे भाजपाच्या गळाला लागू शकतात. तसे झाले तर पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लागेल.
- मुंबई महापालिकेसह शिवसेनेच्या हातातील स्थानिक स्वराज्य संस्थांची भाजपा सरकारकडून गळचेपी होण्याची भीती.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले वैयक्तिक संबंध. सत्तेत कायम राहण्यााबाबत पक्षाच्या मंत्र्यांचा दबाव.

Web Title: The fear of separation from the government, fear of Shiv Sena remained in the state of mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.