विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक
By admin | Published: August 5, 2015 12:39 AM2015-08-05T00:39:01+5:302015-08-05T00:39:01+5:30
‘चला शिकू आणि शिकवू या, एक विकसित भारत घडवू या’ असा संदेश देणाऱ्या प्रशासनाच्या राज्यात ‘आम्हाला शिकू द्या’ अशी विनवणी करण्याची वेळ चांदिवलीतील शालेय
मुंबई : ‘चला शिकू आणि शिकवू या, एक विकसित भारत घडवू या’ असा संदेश देणाऱ्या प्रशासनाच्या राज्यात ‘आम्हाला शिकू द्या’ अशी विनवणी करण्याची वेळ चांदिवलीतील शालेय विद्यार्थ्यांवर ओढावली आहे. शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यासाठी उभ्या असलेल्या पालिकेच्या बुल्डोझरमुळे शाळेतील प्रत्येक तास विद्यार्थ्यांसाठी चिंतेचा बनला आहे.
चांदिवली येथील संघर्षनगर हा दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. चहुबाजंूनी असलेला डोंगराचा वेढा, त्यात वीज-पाण्याच्या गैरसोयीत खडतर रस्त्याने नागरिक हैराण असतात.
त्यात विद्यार्थ्यांना जवळपास शाळा नसल्याने येथील पडीक जागी २००० साली कुशाभाऊ बांगर शाळेची इमारत उभी राहिली. २०१२ मध्ये शाळेला सरकारमान्य अनुदानित शाळा घोषित करण्यात आले. पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग येथे भरत असून जवळपासून ३५० विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत.
मात्र वर्षभरापूर्वी अचानक तेथील विकासकाने शाळेविरोधात बंड पुकारत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाला शाळा परिसराची जागा एमिनिटी प्लॉट दाखवून येथील बांधकाम अनधिकृत असल्यावर विकासकाने शिक्कामोर्तब करून घेतले. १२ जुलै रोजी घरे, धार्मिक स्थळांसह या शाळेच्या इमारतीचे निष्कासन करण्यासाठी पालिका प्रशासन आले.
मात्र ‘आम्हाला शिकू द्या’ अशी मागणी करत हे चिमुकले चक्क रस्त्यावर उतरले होते. शिक्षणापासून वंचित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप हे चिमुकले आणि त्यांचे पालक करत आहेत. या कारवाईविरोधात शिक्षक, विद्यार्थ्यांसह पालकवर्गही आता एकवटला आहे. सध्या शाळेतील वर्गात बसल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्येक तास चिंतेचा, धाकधुकीचा वाटत आहे. कुठल्या क्षणाला शाळेवर पालिकेचा हातोडा पडेल आणि आपण उघड्यावर येऊ, या चिंतेने विद्यार्थी धास्तावले आहेत. (प्रतिनिधी)