मुंबई : आयटीआयच्या तीन कॅप राउंड फेऱ्यांमध्ये आतापर्यंत ७०,४२५ प्रवेश निश्चित झाले असून, त्यातील ५४ हजार ९७८ प्रवेश हे शासकीय आयटीआय तर १५,४४७ प्रवेश खासगी आयटीआयमधील आहेत. तिसºया फेरीपर्यंत आयटीआयमध्ये ४९.५४ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.आयटीआयच्या चौथ्या कॅप राउंडमधील अलॉटमेंटची यादी मंगळवारी जाहीर करण्यात आली. राज्यभरात आयटीआयच्या १ लाख ४२ हजार १४६ जागा आहेत. त्यापैकी शासकीय आयटीआयमध्ये ९२,७१० तर खासगी आयटीआयमध्ये ४९,४३६ जागा आहेत. याशिवाय खासगी आयटीआयच्या इन्टिट्यूट लेव्हलच्या ९,६४४ जागा असून, अल्पसंख्यांकांसाठी १,४३७ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या कॅप राउंडमध्ये ८०,१३४ जागा विद्यार्थ्यांना अलॉट करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३३,२२४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. दुसºया कॅप राउंडमध्ये ५२,१४७ जागा अलॉट करण्यात आल्या होत्या. त्यामधील १४,३६७ जागांवर प्रवेशनिश्चिती झाली आहे. या दोन्ही राउंडमध्ये प्रवेशाची टक्केवारी अनुक्रमे ४१.४६ आणि २७.५५ इतकी होती.विशेष म्हणजे, आयटीआयच्या तिसºया कॅप राउंडला प्रवेशाची टक्केवारी ३७.३३ इतकी राहिली. ३० जुलैच्या कॅप राउंडमध्ये ५६,१०१ जागा अलॉट केल्या होत्या. त्यापैकी केवळ २०,९४५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेशनिश्चिती केली. त्यामुळे चौथ्या फेरीत किती जागा अलॉट होऊन विद्यार्थी प्रवेश निश्चित करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यानंतर होणारे प्रवेश हे समुपदेशन फेरीतून होतील.तिसºया कॅप राउंडनंतरही केवळ ४९.५४ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याने, हजारो जागा रिक्त राहण्याची भीती आहे. खासगी संस्थांमधील रिक्त जागांची संख्या तुलनेने अधिक असेल. या संस्थांत आतापर्यंत इन्स्टिट्युशनल लेव्हलला १४.५२ टक्के तर मायनॉरिटी लेव्हलला ३४.०३ टक्के प्रवेश निश्चिती झाली आहे. प्रवेश प्रक्रियेमध्ये जागांच्या तिप्पट अर्ज आले असताना, प्रवेशाला मात्र विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे.
चार फेऱ्यांनंतरही आयटीआयमधील जागा रिक्त राहण्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2019 5:25 AM