Join us

कोरोनाच्या भयाने इच्छापत्र बनवण्यासाठी तरुणही सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 4:05 AM

महामारीमुळे वाढली मृत्यूची भीतीदीप्ती देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनामुळे जीवनाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने ६० ...

महामारीमुळे वाढली मृत्यूची भीती

दीप्ती देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे जीवनाबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याने ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांसह तरुण, अगदी ३५-४० या वयोगटातील नोकरदारही इच्छापत्र तयार करण्यासाठी वकिलांशी संपर्क साधत आहेत. इच्छापत्र बनविणे हे कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले असले तरी या महामारीमुळे लोकांच्या मनात मृत्यूचे भय वाढत असल्याची जाणीव हाेते.

३८ वर्षीय अकाउंटंट, ४० वर्षीय डॉक्टर, तर ३२ वर्षीय दुकानदार यांनीही कोरोनाच्या भीतीने गेल्याचवर्षी वकिलांशी संपर्क साधून इच्छापत्र बनवले. कोरोनामुळे आपले काही बरेवाईट झाले, तर आपल्या पश्चात कौटुंबिक कलह नको, या भीतीने या तिघांनीही वकिलांशी संपर्क साधून इच्छापत्र तयार केले. इच्छापत्र बनवून द्याल का? असे कॉल तरुणांकडून यायला लागल्याने सुरुवातीला वकिलांनाही गांगरल्यासारखे झाले. तरुण व्यावसायिक, उद्योजक, कौटुंबिक व्यवसायातील लोक आणि कधी नव्हे ते नोकरदारही इच्छापत्र बनवण्यासाठी वकिलांशी संपर्क साधत आहेत.

कोरोना साथीपूर्वी इच्छापत्र बनवण्याचे प्रमाण अत्यल्प होते. संपूर्ण जगात हे प्रमाण अवघे तीन टक्के होते; पण मागील तीन वर्षांत ते सात टक्क्यांवर पोहोचल्याची माहिती ॲड. वीरेंद्र नेवे यांनी दिली. या वाढीव चार टक्क्यांत १.८ टक्का लोक ३५ ते ४० वयोगटातील आहेत. मात्र, त्यात कमावणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यल्प आहे. इच्छापत्र केवळ संपत्ती असलेल्यांनी आणि वृद्ध झाल्यावरच बनवावे, असा सामान्य समज आहे; पण कोरोनामुळे लोकांना जीवनाची शाश्वती नसल्याने त्यांना इच्छापत्र बनविणे योग्य वाटत आहे. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी इच्छापत्र बनवणे चांगले आहे, असेही नेवे यांनी म्हटले.

तर, तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही इच्छापत्र करण्याकडे कल वाढल्याची माहिती ॲड. उदय वारुंजीकर यांनी दिली. इच्छापत्र बनवण्यासंदर्भात महसूल विभागाकडे असलेली माहितीही अत्यल्प आहे. कारण आपल्याकडे इच्छापत्र नोंदणीकृत करणे बंधनकारक नाही. सामान्य माणूस नोंदणीसाठी येणार खर्च टाळण्यासाठी लोक इच्छापत्र नोटराइज करून घेतात आणि ते अंमलदाराच्या स्वाधीन करतात. इच्छापत्राची नोंदणी करणे, हे अधिक सोयीस्कर आहे. कारण नोटरी करून घेतलेल्या इच्छापत्राला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते. त्यामुळे नोंदणीकृत इच्छापत्राला कायद्याच्या दृष्टीने अधिक महत्त्व आहे, असे वारुंजीकर यांनी सांगितले.

जीवनाबाबत असुरक्षितता!

कोरोना साथीमुळे संपूर्ण देश ठप्प झाला, साेबतच लोकांचा आत्मविश्वासही डळमळला आहे. आपण आणखी किती दिवस कुटुंबासोबत राहू, हे माहीत नाही, असा निराशावादी विचार करून लोक इच्छापत्र तयार करण्यास येत आहेत. यात तरुण अधिक असल्याचे पाहून आम्हालाही आश्चर्य वाटले. मात्र, या कोरोनामुळे जवळचे नातलग गमावल्याने काहींच्या मनात जगण्याविषयी असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे ते इच्छापत्र बनवत आहेत, असे ॲड. राधिका सामंत यांनी सांगितले.

.......................................................