लोअर परळमध्ये फेरीवाले-टॅक्सीचालक ‘आमने-सामने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:14 AM2018-07-25T03:14:41+5:302018-07-25T03:15:08+5:30

लोअर परळ पूल वाहतुकीसाठी बंद : शेअर टॅक्सीचा मार्ग बदलला, रेल्वे प्रवाशांना करावी लागणार ८ ते १० मिनिटांची पायपीट

Fearless-taxi driver 'face-to-face' in Lower Parel | लोअर परळमध्ये फेरीवाले-टॅक्सीचालक ‘आमने-सामने’

लोअर परळमध्ये फेरीवाले-टॅक्सीचालक ‘आमने-सामने’

googlenewsNext

मुंबई : धोकादायक लोअर परळ पूल वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे लोअर परळ, करी रोड ते वरळी नाका शेअर टॅक्सींचा मार्ग बदलण्यात आला आहे. आता या टॅक्सी ऊर्मी इस्टेटसमोरील मारुती मंदिरापासून सुरू राहतील. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना आता ८ ते १० मिनिटे चालत जाऊन ऊर्मी इस्टेट येथून शेअर टॅक्सी पकडावी लागणार आहे. मात्र, ऊर्मी इस्टेटजवळ जे फेरीवाले आपला व्यवसाय करतात त्यांना या मार्ग बदलामुळे अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे फेरीवाल्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पूलबंदीमुळे लोअर परळ परिसरातील फेरीवाले आणि टॅक्सीचालक ‘आमने-सामने’ आले आहेत. टॅक्सी थांब्यामुळे येथे गर्दी वाढणार आहे आणि गर्दी वाढली की पालिकेचा अतिक्रमण विभाग आमच्यावर कारवाई करणार आहे. त्यामुळे आम्हाला दररोज एक हजार २०० रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागणार असल्याची माहिती, एका फेरीवाल्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

नव्या थांब्यावर एका वेळी फक्त १५ टॅक्सी
करी रोड व लोअर परळ स्थानकादरम्यान रहदारीच्या ठिकाणी टॅक्सीच्या थांब्याची माहिती आणि सूचना देणारे फलक लावले जातील. आमच्या टॅक्सी संघात ६० टॅक्सी आहेत. दररोज १० जणांना साप्ताहिक सुट्टी असल्याने रोज ५० टॅक्सी प्रवाशांसाठी धावतात. दरम्यान, सुट्टी असलेल्या चालकांना काही दिवस तरी वाहतूककोंडीवर नियंत्रण आणि प्रवाशांना मार्गदर्शन देण्याच्या सूचना केल्या आहेत. याचबरोबर ऊर्मी येथील नवीन थांब्यावर एका वेळी फक्त १५ टॅक्सी उभ्या राहणार आहेत. दरम्यान, शेअर टॅक्सी भाड्यांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे वरळी नाका ते लोअर परळ चालक-मालक संघटनेचे सचिव सुबोध मोरे यांनी सांगितले.

Web Title: Fearless-taxi driver 'face-to-face' in Lower Parel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.