निडरपणे देतात ‘त्या’ आगीशी झुंज...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 05:41 AM2019-05-05T05:41:32+5:302019-05-05T05:41:54+5:30
स्वयंपाकगृहातील विस्तव आणि महिला यांचे नाते जन्मोजन्मीचे. विस्तवाच्या साहाय्याने परिवाराचे उदरभरण करणाऱ्या महिला आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत.
- शेफाली परब-पंडित
मुंबई - स्वयंपाकगृहातील विस्तव आणि महिला यांचे नाते जन्मोजन्मीचे. विस्तवाच्या साहाय्याने परिवाराचे उदरभरण करणाऱ्या महिला आज सर्वच क्षेत्रांत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. एकीकडे कमजोर हृदयाची आणि नाजूक चणीची समजली जाणारी ही महिला आता या आगीशीही झुंज देऊ लागली आहे. मुंबईत दररोज १०-१२ ठिकाणी आगीच्या घटना घडतात. अशा वेळी अग्निशमन दलातील जवानांच्या बरोबरीने तीदेखील घरदार, कुटुंबाची चिंता मागे सोडून जोखमीच्या मोहिमेवर जात आहे. ४ मे आंतरराष्टÑीय अग्निशमन जवान दिनानिमित्त या महिलांशी साधलेला संवाद प्रेरणादायी आहे.
बालपणापासूनच वडिलांचा खाकी वर्दीतील रुबाब पाहून पूजा मोहिते यांना अप्रूप वाटायचे. त्यातूनच त्यांनी ही वेगळी वाट निवडली, पण हा प्रवास तितकाच खडतर व जोखमीचा होता. या प्रशिक्षणात महिला म्हणून वेगळा न्याय नव्हता. त्यामुळेच या वर्दीचे खरे मोल कळते, असे त्या आवर्जून सांगतात. तर देवासारखी आपली वाट पाहणाºया पीडितांना आगीतून सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांच्या चेहºयावरचे कृतज्ञतेचे, समाधानाचे ते भाव, आपले कार्य सार्थकी लागल्याचा आनंद देतात, लाखमोलाचे वाटतात, असे भायखळा अग्निशमन केंद्रातील लता शिंदे यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉलपटू लता शिंदे यांना खेळातील आवडच या जोखमीच्या क्षेत्रापर्यंत घेऊन आली. त्या गेली सहा वर्षे आगीशी झुंज देत बचावकार्य करीत आहेत.
...अन् त्यांनी केले कौतुक
लालबाग येथे दोन मजली चाळीला लागलेल्या आगीत सिलिंडरचे एकापाठोपाठ एक स्फोट होत होते. पाण्याचा दाब वाढविण्यासाठी जंबो टँकरवर पूजा मोहिते चढत असताना तिथे जमा असलेल्या लोकांनी ही तर मुलगी आहे, ही काय करणार, असा सवाल उपस्थित केला. तरीही पूजा यांनी मनोधैर्य कमी होऊ न देता काम सुरू ठेवले. शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. त्या वेळी त्यांना नावे ठेवणा-या लोकांनी त्यांचे कौतुक केले. त्या दिवशी आनंदाने झोपच आली नाही, असे त्या प्रांजळपणे सांगतात.