Join us

म्हाडातर्फे गिरणी कामगारांना १५ फेब्रुवारीची मुदत; ऑनलाइन, ऑफलाइन कागदपत्रे द्यावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 9:53 AM

गिरणी कामगारांची कागदपत्रे म्हाडातर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे.

मुंबई : बंद, आजारी अशा ५८  गिरण्यांमधील म्हाडाकडे नोंदणीकृत व  यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची पात्रता निश्चितीकरिता ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी सुरू असलेल्या अभियानाला १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

१४ सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या अभियानामध्ये गिरणी कामगारांची कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता म्हाडातर्फे ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. यापूर्वी ऑफलाइन अथवा ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केलेल्या गिरणी कामगार वारसांना नव्याने कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाइन पद्धतीने वांद्रे पूर्व येथील एमआयजी क्रिकेट क्लब जवळील समाज मंदिर हॉल येथे सादर करावीत. ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मोबाइल ॲप आहे. https://millworkereligibility.mhada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाइन कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

१,०४,९६० अर्ज प्राप्त :

गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानात ऑफलाइन व ऑनलाइन पद्धतीने एकूण १,०४,९६० अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ८१,८२५ अर्जदार पात्र ठरले असून उर्वरित अर्जांची छाननी करून पात्र / अपात्र निश्चितीची कार्यवाही सुरू आहे.यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या १,५०,४८४ गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने सादर करावी.

पात्रता निश्चितीकरिता आवश्यक कागदपत्रे :

१) गिरणी कामगारांचे ओळखपत्र२) तिकीट नंबरची प्रत३) सर्व्हिस प्रमाणपत्र४) लाल पास५) प्रॉव्हिडंट फंड क्रमांक६) ईएसआयसी  क्रमांक७) मिल प्रमाणपत्र प्रत८) हजेरी पत्र९) लीव्ह रजिस्टर प्रत१०) उपदान प्रदान आदेश११) भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत१२) पगार पावती१३) आधार कार्ड

 काही अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता ९७१११९४१९१ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईम्हाडा