मावशीसह तरुणाला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आई-वडिलांच्या निधनानंतर आधार ठरलेल्या मावशीने १३ वर्षीय मुलीचा बालविवाह लावून दिला. त्यानंतर सुरू झालेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळलेल्या मुलीने एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीची तत्काळ दखल घेत, मावशीसह १९ वर्षीय तरुण आणि त्याच्या नातेवाइकांना अटक केली.
तक्रारदार मुलगी मूळची बिहारची रहिवासी आहे. पालकांच्या मृत्यूनंतर लोअर परळ येथे राहण्यास असलेल्या मावशीने घरकामाला मदत म्हणून तिला सोबत आणले. जानेवारीपासून ती मावशीकडे राहत हाेती. तीन आठवड्यांपूर्वी तिच्या मावशीने एका मुस्लीम तरुणासोबत तिचा जबरदस्तीने विवाह लावून दिला. लग्नानंतर तरुणाकडून तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. सातत्याने हाेणाऱ्या या अत्याचाराला कंटाळून मुलीने रविवारी एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार पॉक्सो, बलात्कार, बालविवाह कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून पाेलिसांनी १९ वर्षीय तरुणासह त्याचे नातेवाईक, मुलीची मावशी आणि मौलवीला अटक केली.
आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी लग्न झाले नसल्याबाबत सांगितले. मात्र मुलीचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
...........................
...........................