मुंबई : राज्यात शासन स्तरावर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा रद्दचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही व्यवसायिक अभ्यासक्रमांसाठी त्यांच्या शिखर संस्थांची मंजुरी व एटीकेटी , बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतील निर्णय यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अद्याप संभ्रम आहे. तरीही मुंबई विद्यापीठाकडून मात्र पुढील काही परीक्षांसाठी तसेच अंतिम वर्षाच्या काही सत्रांसाठी परीक्षांसाठी नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे. राज्य सरकारकडून परीक्षाच रद्द करण्यात आल्या आहेत नोंदणी शुल्क नेमके कसले असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून वारंवार विचारला जात असूनही निकालासाठी, तसेच प्रमाणपत्रांसाठी आवश्यक प्रक्रियेचे शुल्क म्हणून विद्यार्थ्यांना हटकले जात असून शुल्क भरण्याची जबदरदस्ती केले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत.परीक्षा रद्द असतानाही मुंबई विद्यपीठ एम. एस. सी. मॅथमॅटिकच्या विद्यार्थ्यांना सुरुवातीला १४०० आणि आता १७०० असे वाढीव शुल्क भरण्यास संगितल्याची तक्रार एका विद्यार्थ्याने केली आहे. मुबंई विद्यपीठाच्या १५० विद्यार्थ्यांनकडून हे शुल्क अट्टाहास सुरु असल्याची माहिती विद्यार्थी भारतीच्या अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली. परीक्षांचा निकाल आणि प्रमाणपत्रे यांच्यासाठी जर विद्यापीठाला पैसे लागणार असतीलच तर त्याचा खर्च ही त्यांनी जाहीर करावा आणि तसे शुल्क आकारण्यात यावे. परीक्षा रद्द केलेल्या असताना प्रत्येक विद्यार्थ्यांकडून इतके अवाजवी शुल्क आकाराने म्हणजे गैरप्रकार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिव स्नेहल कांबळे यांनी दिली.आधीच लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात येत्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठीही कोणताही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. यामध्ये, महाविद्यालये विशेषत: परीक्षा नसताना परीक्षा शुल्काची विचारणा करु शकत नाहीत. आमच्या संस्थेने या शैक्षणिक वर्षाची शुल्क रचना कमी करण्याबाबत राज्यपालांना पत्र लिहिले असल्याची माहिती स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिली.
परीक्षा रद्द तरीही मुंबई विद्यापीठाकडून शुल्क आकारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 6:30 PM