वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशनिश्चितीसाठी शुल्कात हवी मुभा ... !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 05:22 PM2020-05-19T17:22:53+5:302020-05-19T17:23:16+5:30
आत्ता १० टक्के व लॉकडाऊन उठल्यानंतर टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्याची मुभा देण्याची मागणी
मुंबई : राज्यातील कोट्याअंतर्गत एमडी , एमएस सारख्या विविध वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशप्रक्रिया सुरु करण्याच्या निमित्ताने सीईटी सेलकडून निर्देश जारी करण्यात आपले आहेत. यासाठी अभ्यासक्रमाच्या जागांसाठी गुणवत्ता यादी राज्य प्रवेश नियामक प्राधिकरणांनी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. मात्र या प्रवेशांच्या ऑनलाईन किंवा फिजिकल प्रवेशनिश्चितीवेळी मूळ कागदपत्रे आणि शुल्क भरणे विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. मात्र सध्यस्थितीतील लॉकडाऊनच्या काळात आर्थिक परिस्थिती बिघडल्याने या पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे संपूर्ण शुल्क भरायचे कसे प्रश्न विद्यार्थी पालकांसमोर उभा राहिला आहे. शुल्क न भरल्यास विद्यार्थ्यांना सदर अभ्यासक्रमाच्या संबंधित संस्थेतील जागेला मुकावे लागणार असल्याने काय करावे असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे.
कोव्हीड-१९ विषाणूचे वाढते संक्रमण आणि त्यामुळे संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा आर्थिकदृष्ट्या फटका सर्वांनाच बसला आहे. या बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये विद्यार्थी पूर्ण शुल्क भरू शकत नाहीत. तसेच शैक्षणिक कर्जाकरिता बँकेची प्रक्रिया सुद्धा सध्या पूर्ण होत नाही आहे. अशा अडचणीत सापडलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शुल्क भरण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत. यासाठी अनेक तक्रारी व विनंत्या युवसेनेकडे ही विद्यार्थ्यांनी केल्या. याची दखल घेत युवसेनेचे सचिव वरून सरदेसाई यांनी सीईटी आयुक्ताना वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत पत्र लिहिले आहे.
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या आणि आपल्या मार्फत होणाऱ्या इतर अभ्यासक्रमाच्या सर्व प्रवेशांमध्ये विध्यार्थ्यांना महाविद्यालयाचे शुल्क भरण्याकरिता योग्यती मुभा देण्यात यावी. जेणेकरून हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. प्रवेश निश्चित करताना विद्यार्थ्यांना शुल्काचे १० टक्के आणि उर्वरित शुल्क लॉकडाऊन उघडल्यानंतर टप्प्या टप्प्याने भरायला सांगितले तर ते विद्यार्थ्यांना अधिक सोईचे होईल, असे विद्यार्थ्यांनी सुचविले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. या प्रवेशाबाबत तातडीने उपाय योजना करून तसे निर्देश जाहीर करावे अशी मागणी युवसेनेने केली असल्याची माहिती युवसेनेचे कोर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी दिली.