कोविड काळात पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना शुल्कमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:06 AM2021-06-30T04:06:12+5:302021-06-30T04:06:12+5:30
उदय सामंत; वापरात नसणाऱ्या सुविधांनाही शुल्कमाफी, ग्रंथालय, प्रयोगशाळा शुल्कात ५० टक्के सवलत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड १९ ...
उदय सामंत; वापरात नसणाऱ्या सुविधांनाही शुल्कमाफी, ग्रंथालय, प्रयोगशाळा शुल्कात ५० टक्के सवलत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे आई/वडील/पालकांचा मृत्यू झाला, अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील अनुदानित महाविद्यालये तसेच विद्यापीठ विभागातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी विविध प्रकारचे शुल्क आकारण्यात येते. या अंतर्गत जिमखाना, उपक्रम शुल्क, महाविद्यालयीन मासिक शुल्क, संगणक, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत, युवा महोत्सव अशा विविध बाबी आणि सुविधांसाठी शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जाते. यापुढे यामधील ज्या बाबी आणि सुविधांवर खर्च झालेला नाही त्यावर आकारण्यात येणारे शुल्कही पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.
सद्यस्थितीत वसतिगृहांचाही वापर विद्यार्थ्यांकडून होत नसल्याने वसतिगृह शुल्कापोटी करण्यात येणारे शुल्कही यंदा विद्यार्थ्यांसाठी माफ करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली. शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालये कोरोनामुळे बंद आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू असून, ऑनलाइन अभ्यासक्रम सुरूच आहेत. ऑनलाइन अभ्यासक्रमासाठीची ई कंटेंट खरेदी, तसेच प्रयोगशाळा व त्यांची देखभाल, ग्रंथालये यांची काळजी यासाठी महाविद्यालयांना खर्च आला आहे. त्यामुळे हे शुल्क सरसकट माफ न करता यात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून ५० टक्के सवलत विद्यार्थ्यांना देण्यात येईल.
* विनाअनुदानित / कायम विना अनुदानितचा प्रश्न कायम
खासगी / विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयांच्या शुल्कमाफी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने ठोस निर्णय घेतलेला नाही. या महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधीत सवलत देण्यात येणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले; मात्र या महाविद्यालयांकडून आकारण्यात येणाऱ्या सुविधांवरील आणि इतर विविध शैक्षणिक बाबींवरील शुल्क माफ करण्यात येणार असून, प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येईल. दरम्यान, या महाविद्यालयांमधील शुल्कमाफी ठरविण्यासाठी शुल्क नियम प्राधिकरणाने प्रस्ताव सादर करून सुवर्णमध्य काढावा, असे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे.
........................................