Join us

सी-गल्स पक्ष्यांना खायला घालणं कितपत योग्य ?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 12:38 PM

सी-गल्सचे नैसर्गिक वर्तन आणि अस्तित्त्व नष्ट होण्याती भीती

मुंबई- प्रत्येकवर्षी परदेशी पाहुणे आले, परदेशी पाहुणे पाहायला लोकांची गर्दी, वाशी-शिवडी किनाऱ्यावर 'पक्षीप्रेमी'ची झुंबड अशा बातम्या आणि फोटो दाखवत सी गल्स आणि फ्लेमिंगोंचे फोटो प्रसिद्ध होतात. थंडीपासून बचाव करण्यासाठी हे पक्षी भारतामध्ये येतात. मुंबईजवळ वाशी, शिवडी, ठाणे, कल्याण अशा विविध किनार्यांवर खाडीजवळ हे पक्षी येतात. काही वर्षांपुर्वीपर्यंत या पक्ष्यांना पाहणे, त्यांचं निरीक्षण करणे, फोटो काढणे यापर्यंत मर्यादित असलेल्या लोकांनी आता एक पाऊल पुढे टाकले आहे. गेल्या दोन- तीन वर्षांमध्ये कबुतरांप्रमाणेच सी गल्सला खायला घालण्याची चढाओढ लागलेली दिसते. पाँपकाँर्न, शेंगदाणे, चणे-फुटाणे, फरसाण, ब्रेडचे तुकडे अशा वेगवेगळ्या प्रकारचं खाणं त्यांना देणं सुरु केलंय. त्यामुळे सीगल्सचा नैसर्गिक आहार बदलून त्यांना या प्रकारचं खाणं आवडायला लागलं आहे. मुंबई ठाणे आसपासच्या परिसरातील लोकांच्या या वर्तनामुळे सी-गल्सचे नैसर्गिक वर्तन आणि अस्तित्त्व नष्ट होण्याती भीती निर्माण झाली आहे.याबाबत बोलताना पर्यावरण अभ्यासक केदार गोरे म्हणाले, "सी- गल्स किंवा कोणताही प्राणी, पक्षी यांना खायला घालण्यामागच्या हेतूबाबत शंका नाही. आपण त्यांना खायला घालून चांगलं काम करत आहोत, पुण्य मिळवत आहोत असा चांगला समजच लोकांचा असेल. पण त्याचा नक्की त्या प्राण्याला किंवा पक्ष्याला फायदा होतो की तोटा हे पाहाण्याची गरज आहे. मुंबई परिसरात अनेक ठिकाणी लोक फरसाण, पापडी, गाठीयांची पाकिटंच्या पाकिटं सीगल्ससमोर मोकळी करतात. या खाण्याची सवय लागलेले सीगल्स त्यावर अक्षरशः तुटून पडतात. वास्तविक सी- गल्सचं मुख्य खाणं मासे, खेकडे, खाडीतले जीवजंतू किंवा मृत जीव हे आहे. ते येथे मुबलक मिळते म्हणूनच ते येथे स्थलांतरित होतात. पण आपण त्यांना त्याहीपेक्षा सोपा आयता मार्ग दिल्यामुळे त्यांचं खाणंच बदलून टाकलं आहे. त्यांच्या जीवनामध्ये असा कृत्रिम बदल करणं अत्यंत अयोग्य आहे. फरसाण, पापडी, ब्रेडचे तुकडे, चिवडा हे त्यांंचं खाणं आजिबात नाही. याचा त्यांच्या वर्तनावर, आहार संरचनेवर, पचनसंस्थेवर आणि संख्येवर विपरित परिणाम होईल. त्यामुळे नागरिकांचा हेतू चामगला असला तरी त्यांना खायला घालणं निसर्गाच्यादृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. पक्षी पाहायला जाणं, त्यांचं दुर्बिणीतून निरीक्षण करणं, फोटो काढणं, लहान मुलांना त्यांची माहिती देणं यापुरताच छंद मर्यादित ठेवला पाहिजे. आज शहरामध्ये कबुतरांचा आहार बदलून एकाच पक्ष्याला आधार आणि संरक्षण देऊन निर्माण झालेले प्रश्न आपण पाहात आहोत. तशाच प्रकारे सी-गल्सचे होऊ देऊ नका, असे त्यांनी सांगितले.