विद्याविहार रेल्वे पुलाच्या गर्डरच्या वजनामुळे वाढले सल्लागार कंपनीचे शुल्क
By जयंत होवाळ | Published: January 30, 2024 07:28 PM2024-01-30T19:28:35+5:302024-01-30T19:28:53+5:30
आधी गर्डरचे वजन १५०० मेट्रिक टन होते, ते २१०० मेट्रिक टन झाले. गर्डरचे वजन ६०० मेट्रिक टनने वाढले.
मुंबई : विद्याविहार रेल्वे स्थानक येथे मुंबई महापालिका बांधत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीच्या शुल्कात २ कोटी ५३ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. मूळ २ कोटी १० लाख रुपये कंपनीला दिले जाणार होते. आता ४ कोटी ६३ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. पर्यवेक्षणाचे काम आणि गर्डरचे वजन ६०० मेट्रिक टनने वाढल्याने सल्लागार शुल्कात वाढ झाली आहे.
विद्याविहार स्थानकाजवळ पूर्वेकडील रामचंद्र चेंबूरकर आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग जोडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. दोन पिलरवर बांधण्यात येणाऱ्या या पुलाच्या दोन पिलरच्या मध्ये अन्य पिलर नसेल. अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा मुंबईत पहिल्यांदा वापर होत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये पुलाचा दुसरा गर्डर बसवण्यात आला .
या पुलाच्या कामासाठी मे. राईट्स लिमिटेड कंपनीची २०१८ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीची नियुक्ती २०२१ पर्यंत होती. मात्र करोना काळात काम बंद पडले होते. शिवाय रेल्वेकडूनही काही परवानग्या मिळण्यास विलंब झाला. तसेच रेल्वे रुळावर बसविण्यात येणाऱ्या गर्डरच्या आराखड्यात रेल्वेने वेळोवेळी बदल सुचवले . हे बदल करून नवा आराखडा तयार करण्यात आला. त्यामुळे सल्लागार कंपनीचा कार्यकाळ वाढवण्यात आला.
आधी गर्डरचे वजन १५०० मेट्रिक टन होते, ते २१०० मेट्रिक टन झाले. गर्डरचे वजन ६०० मेट्रिक टनने वाढले. त्यामुळे कंपनीला काही महिन्यांचे पर्यवेक्षण शुल्क व गर्डरच्या अतिरिक्त वाढलेल्या वजनासाठी फेब्रिकेशनच्या कामाचे शुल्क वाढवून द्यावे लागले आहे. उड्डाणपुलाचा अंदाजित खर्च सुमारे १७८ कोटी रुपये आहे. लालबहादूर शास्त्री मार्ग व रामचंद्र चेंबूरकर मार्ग यांना जोडणारा हा उड्डाणपूल दोन मार्गिकांचा आहे. एकूण ६५० मीटर लांबीच्या या प्रकल्पात रेल्वे रुळांवर १०० मीटर पूल, तर पूर्व बाजूस २२० मीटर आणि पश्चिम बाजूला ३३० मीटर पोहोच मार्ग बांधण्यात येत आहे.रेल्वे रुळांच्यावर असलेल्या पुलाची रुंदी २४.३० मीटर राहणार आहे. यात दोन्ही बाजूला प्रत्येकी २ मीटरचे पदपथ समाविष्ट आहेत. पुलाचा पोहोच मार्ग हा एकूण १७.५० मीटर रुंदीचा असेल. त्यात प्रत्येकी १ मीटरचा पदपथ दोन्ही बाजूस समाविष्ट असेल.