Join us

विद्यार्थ्यांच्या शुल्कातून मुंबई विद्यापीठाकडे कोटींची रक्कम जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 3:18 AM

विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती यातून मुंबई विद्यापीठाने आजपर्यंत करोडो रुपये कमविले आहेत;

मुंबई : विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन आणि उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती यातून मुंबई विद्यापीठाने आजपर्यंत करोडो रुपये कमविले आहेत; मात्र विद्यापीठात विद्यार्थी सोयीसाठी एक अ‍ॅम्ब्युलन्सही उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या शुल्काचे पैसे किमान विद्यार्थी विकासासाठी वापरावेत आणि शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी स्टुडण्ट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे. नुकतीच त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली २०१० ते २०१७ दरम्यान परीक्षा शुल्क, पुनर्मूल्यांकन, छायांकित प्रती यांमधून मिळणाऱ्या शुल्काची माहिती मागवली होती. त्यामधून ही माहिती समोर आल्याचे पवार यांनी सांगितले.परीक्षांचे निकाल लागल्यानंतर मनासारखे गुण मिळाले नाहीत तर पुनर्मूल्यांकन करण्याची सुविधा मुंबई विद्यापीठात आहे. तसेच विद्यापीठ विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रतही देते. गेल्या काही वर्षांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणाºयाची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. परिणामी, पुनर्मूल्यांकनाच्या शुल्काद्वारे विद्यापीठाने २०१० ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ३० कोटी ७६ लाख ४६ हजार ५९२ इतकी रक्कम पुनर्मूल्यांकनातून जमा केली असल्याचे माहितीच्या अधिकारातून समोर आले आहे. तसेच छायांकित प्रतींतून या वर्षांत विद्यापीठाकडे एकूण १ कोटी ६८ लाख ५२ हजार ९६० रुपये जमा झाले असल्याचे समोर आले आहे. उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्यासाठी मानधन देणे, प्रवास खर्च यासाठी प्राध्यापकांना दिला जाणारा खर्च या रकमेतून भागविला जात असल्याची माहितीही विद्यापीठाकडून दिली गेली आहे.दरम्यान, विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने माहितीच्या अधिकारात पुरविलेल्या माहितीवर आक्षेप घेत किरकोळ खर्च म्हणून विद्यापीठाने दाखविलेला प्रतिवर्ष ४ ते ५ लाख खर्च नेमका कशाचा आहे याचा खुलासा विद्यापीठाने करावा, अशी मागणी स्टुडण्ट लॉ कौन्सिलकडून करण्यात आली आहे. सोबतच प्राध्यापकांना विद्यापीठाकडून मानधन मिळत असताना पुनर्मूल्यांकनाचे मानधन आणि प्रवास खर्च का पुरवला जातो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विद्यापीठाने या जमा होणाºया रकमेचा वापर विद्यार्थी कल्याणासाठी करावा, अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.