Join us  

दहावीत सवलतीच्या गुणांसाठी मोजावे लागणार पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 8:15 AM

राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कला व क्रीडा क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीच्या बळावर दहावीत सवलतीचे गुण दिले जातात. त्यामुळे सवलतीच्या अतिरिक्त गुणांसाठी विद्यार्थी शाळा, शिक्षणाधिकारी किंवा जिल्हा क्रीडाधिकारी यांच्यामार्फत प्रस्ताव दाखल करतात. मात्र, यंदापासून विद्यार्थ्यांना या गुणांसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. प्रस्ताव दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून ५० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे. 

प्रस्तावांची संख्या वाढते म्हणून कला व क्रीडा विषयातील अतिरिक्त गुणांसाठी खेळाडू विद्यार्थी मंडळाकडे प्रस्ताव दाखल करतात. या प्रस्तावामध्ये त्रुटी असल्यामुळे संबंधित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करावा लागतो. या कला, क्रीडा प्रकारांत सहभागी विद्यार्थ्यांच्या प्रस्तावाची संख्या दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जादा कर्मचारी विभागीय मंडळस्तरावर घ्यावे लागतात. त्यासाठी वेळ, श्रम, आदींचा विचार करता प्रतिविद्यार्थी ५० रुपये छाननी शुल्क आकारण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे सचिव अनुराधा यांनी छाननी शुल्क आकारणीसाठी दिलेल्या सूचनापत्रात म्हटले आहे. 

कला-क्रीडा प्रकारांत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मंडळाकडून गुण दिले जातात. यामधील अनेक गुणवंत विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असतात; पण आता त्यांना ५० रुपये देऊन मंडळाकडून गुण विकत घ्यावे लागणार असतील तर हा त्या गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. विद्यार्थी शाळा आणि महाविद्यालयांचे प्रतिनिधित्व करीत असताना या विशेष गुणांसाठी पात्र ठरत असतात. त्यामुळे हे शुल्क नेमके कोणाकडून आकारावे याचा मंडळाने पुन्हा एकदा विचार करावा. - सबॅस्टियन फर्नांडिस, मुंबई स्कूल स्पोर्ट्स असोसिएशन

टॅग्स :मुंबईशिक्षण