मुंबई - पोलिस भरतीच्या वेळी वाशिमच्या उमेदवाराच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच, मंगळवारी आणखीन एका उमेदवाराच्या मृत्यूची घटना घडली. अमर अशोक सोलके (२४) असे या तरुणाचे नाव असून, तो अमरावतीचा रहिवासी आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अमरावती येथील नवसारीतील रहिवासी असलेला अमर पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी मुंबईत आला होता. फोर्ट परिसरातील रेसिडन्सी हॉटेलमध्ये तो वास्तव्यास होता. मैदानावरील चाचणी पूर्ण केल्यानंतर अमरला अस्वस्थ वाटू लागले. तसे त्याने त्याच्या परिचित व्यक्तीला कळविले. त्यानंतर, सायंकाळी हॉटेलच्या खोलीवर आंघोळ करत असताना त्याला उलटी झाली व तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. सेंट जॉर्ज रुग्णालयात अमरला नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकारामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
अतिताणामुळे पोलिसाचा मृत्यू संरक्षण शाखेतील पोलिस हवालदार सुनील महादेव होडबे (५५) यांचा ताणामुळे मृत्यू झाला. सुनील माहीम नवीन पोलिस वसाहतीत राहण्यास होते. रात्रपाळीला जायचे असल्याने त्यांच्या पत्नीने मंगळवारी दुपारी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते उठत नसल्याने त्यांना जवळच्या खासगी रुणालयात नेले. तेथे उच्च रक्तदाब आणि यकृताच्या आजाराने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.