दुचाकीवरून कोसळले अन् ट्रकने चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:19 IST2025-03-21T13:19:09+5:302025-03-21T13:19:20+5:30
या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

दुचाकीवरून कोसळले अन् ट्रकने चिरडले
मुंबई : वाहतूककोंडीतून दुचाकी बाहेर काढत असताना झयाउल्ला इद्रीसी (वय ६२) खाली कोसळले. ते उठून उभे राहण्यापूर्वीच पाठीमागून आलेल्या ट्रकखाली चिरडले गेल्याची घटना सोमवारी कुर्ला येथे घडली. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.
झिकरुल्ला सिद्दिकी (३५, रा. गोवंडी) यांचे काका इद्रीसी (रा. पुणे) हे रविवारी पुण्यातून त्यांच्या नालासोपारा येथील घरी आले होते. सोमवारी केवायसी अपडेट करण्याकरिता बँकेत जाण्यासाठी इद्रीसी यांनी सिद्दिकी यांना सांताक्रुझमध्ये बोलावले. सिद्दिकी हे दुचाकीने सांताक्रुझ येथे गेले. तेथून त्यांनी काकांना वांद्रे येथे बँकेत नेले. तेथून दुपारी सिद्दिकी हे काकांना दुचाकीवरून गोवंडी येथील घरी आणत होते.
रुग्णालयात दाखलपूर्व मृत घोषित
कुर्ला येथे वाहतूककोंडी असल्याने सिद्दिकी यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काका दुचाकीवरून खाली पडले.
तितक्यात पाठीमागून आलेल्या ट्रकने इद्रीसी यांना चिरडले. सिद्दिकी यांनी काकांना भाभा रुग्णालयात नेले. मात्र, डाॅक्टरांनी दाखल पूर्व मृत घोषित केले.
पोलिसांनी ट्रकचालकाला केली अटक
या घटनेची माहिती मिळताच कुर्ला पोलिसांनी घटनास्थळाहून ट्रकचालक अनिलकुमार टी. थाॅमस (५७, रा. केरळ) याला ताब्यात घेतले. सिद्दिकी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.