लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘स्पेसस्केप्स’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्यासमोर विलक्षण अमूर्त चित्रे येतात. मी ॲाब्स्ट्रॅक्ट चित्रांची चाहती असून, सुजाताच्या कुंचल्यातून कॅनव्हासवर अवतरलेल्या रंगांच्या खऱ्या अर्थाने प्रेमात पडले आहे. हे प्रदर्शन जबरदस्त असून, पुस्तकही सुरेख असल्याचे कौतुकोद्गार ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी मंगळवारी काढले. चित्रकार सुजाता बजाज यांच्या ‘स्पेसस्केप्स’ या चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात त्या बोलत होत्या.
जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार सुजाता बजाज यांच्या ‘स्पेसस्केप्स’ या चित्रांच्या सिरीजचे प्रदर्शन भरले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘स्पेसस्केप्स बाय सुजाता बजाज’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी, फाल्गुनी नायर, अर्मेस फॅमिलीचे फेडरिक ड्युमास व लिन ड्युमास, संगीता जिंदाल आणि शबाना फैजल प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा, तसेच कला क्षेत्रातील मान्यवरही यावेळी उपस्थित होते. सुरुवातीला रुने लार्सन यांनी पत्नी सुजाता बजाज यांच्या चित्रकलेच्या आवडीबाबत तसेच त्यांच्या काम करण्याच्या शैलीबाबत विस्तृतपणे सांगितले. या प्रसंगी सुजाता बजाज म्हणाल्या की, मागील दोन वर्षांपासून ‘स्पेसस्केप्स बाय सुजाता बजाज’ या पुस्तकावर काम केले असून, आज ते प्रकाशित झाल्याचा खूप आनंद आहे.
माझ्यासारख्या वर्ध्यातील मुलीवर मुंबईकरांचे हे प्रेम माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या सिरीजमधील चित्रांवर मी पाच वर्षे काम केले. या प्रदर्शनात ५० चित्रे आहेत असे त्या म्हणाल्या.
सुजाता बजाज ज्या प्रकारे चित्रांद्वारे व्यक्त होतात ते खूप आवडत असल्याचे सांगत चित्रकार जयश्री भल्ला म्हणाल्या, त्या नेहमीच आपल्या चित्रांद्वारे परिपक्वतेचे दर्शन घडवतात. यामुळे नवनवीन पैलू समोर येतात. या प्रदर्शनातील कोणतेही लहान-मोठे चित्र चित्रकलेतील नवा आयाम दर्शविणारे असल्याचेही त्या म्हणाल्या.
स्वप्नांतील चित्रे कॅनव्हासवर रेखाटली
सुजाता बजाज या मूळच्या विदर्भातील वर्ध्यातील आहेत. महात्मा गांधीजी तसेच विनोबा भावेंसारख्या थोर पुरुषांच्या सहवासात वाढलेली आहे. पॅरिसमध्ये गेल्यावर त्यांच्या कामात एक वेगळी चमक निर्माण झाली. त्यांच्या नेहमीच्या चित्रांपेक्षा या प्रदर्शनातील चित्रे खूप वेगळी आहेत. या चित्रांमधील रंगसंगती खऱ्या अर्थाने मन मोहणारी आहे. त्यांच्या आजवरच्या ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिग्जपेक्षा ‘स्पेसस्केप्स’मधील चित्रे ‘ड्रीम पेंटिंग्ज’ आहेत. मला वाटते त्यांना एखादे स्वप्न पडले असेल आणि त्या स्वप्नामध्ये त्यांनी कॉसमॉस बघितले असेल. त्या कॉस्मिक रंगांमध्ये त्यांनी ही चित्रे रंगवली असतील असेही वाटते. - डॉ. विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड