पर्यटन महामंडळात तरुणांना फेलोशिपची संधी, महिना ४० हजार स्टायफंड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 12:56 PM2023-04-23T12:56:18+5:302023-04-23T12:56:53+5:30
उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.
मुंबई : राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रांतील नवीन दृष्टिकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी दि. १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. निवड झालेल्या फेलो उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये छात्रवृत्ती आणि ५ हजार रुपये प्रवास भत्ता व इतर खर्च असे एकूण ४० हजार रुपये दरमहा देण्यात येणार आहेत.
पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जाणार आहे. या फेलोशिपसाठी २१ ते २६ वर्षे वयोमर्यादा असलेल्या आणि २१ ते २६ वर्ष वयोमर्यादेतील कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारकांना अर्ज करता येईल. उमेदवारांना किमान एक वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.